सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. याची काँग्रेसकडून दखल घेण्यात आली आहे. परिणामी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदावर पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागू शकते. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार मानावी लागली. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून याची दखल घेण्यात आली असून त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या नेतृत्वात बदल करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?
मविआमध्ये फूट?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार नसल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यासाठी फारसे उत्सुक नसल्याचं शरद पवार गटातील बड्या नेत्याने सांगितलं आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी काँग्रेसला संवाद ठेवण्याची विनंती केली आहे. संवाद तुटला तर कुठलीही आघाडी यशस्वी होत नाही असा सल्ला राऊतांनी काँग्रेसला दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर एकदाही मविआमध्ये संयुक्तरित्या बैठक झालेली नाही. विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठीही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन चर्चा केली नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत साशंकता आहे.