जाहिरात

India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?

नितीशकुमार यांनी अनेकदा आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळेच विरोधक त्यांचा "पलटूराम" असा उल्लेख करतात. चंद्राबाबू नायडू यांनीही यापूर्वी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती.

India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?
मुंबई:

इंडिया आघाडीत बिघाडी होत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. दिल्ली केजरीवाल यांनी वेगळी चुल मांडली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तर तेजस्वी यादव यांनी इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठीच होती असं वक्तव्य केलं आहे. त्यात आता राज्यात शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. तर शरद पवारांनी आरएसएसची स्तुती करत भाजपला पुन्हा एकदा चुचकारल्याची स्थिती आहे. या सर्व घडामोडी पाहाता इंडिया आघाडीचं भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय या सर्व घडामोडी मागे काही मोठी राजकीय खेळी खेळली जात आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 
इंडिया आघाडी फुटलीय असं म्हणायचं का ?

आघाडीच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्ये व त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिका बघता इंडिया आघाडीत फूट पडलीय हे तर स्पष्टच दिसते असं जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील  पक्ष परस्परविरोधी लढत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीचे अस्तित्व पुढील काळात केवळ संसदेतील "फ्लोअर मॅनेजमेंट" पर्यंत मर्यादित असेल,असे दिसते असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Sanjay Raut: ठाकरेंच ठरलं! सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार; संजय राऊतांची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठीच ही आघाडी होती असं का म्हणतायत?

इंडिया आघाडी लोकसभेसाठी झाली होती हे वास्तव आहे. इंडिया आघाडी भाजपाला राष्ट्रीय पातळीवर पर्याय म्हणून उभी राहिली. पण या आघाडीत सहभागी झालेल्या अनेक पक्षांना त्यांच्या राज्यात काँग्रेससोबत आघाडी करण्यात अजिबात रस नव्हता, आता ही नाही. असं अभय देशपांडे यांचे मत आहे.  ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस किंवा आम आदमी पार्टीला पश्चिम बंगाल वा दिल्लीत काँग्रेस बरोबर आघाडी नको आहे. शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय. त्यामुळे ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती असं म्हणण्याला वाव आहे.  

ठाकरे गटाची स्वबळाची भाषा, आदित्य फडणवीसांना वारंवार भेटतायत; याचा अर्थ काय?

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे सेनेसमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना भाजपाबाबत पूर्वीसारखी आक्रमक भूमिका घेणे परवडणारे नाही. त्यामुळे तू राहशील, नाही तर मी राहीन, अशी टोकाची व एकेरी भाषा करणाऱ्या ठाकरे सेनेकडून कटुता कमी करण्यासाठी प्रयत्न आहे. तर केंद्रात यावेळी स्वबळावर बहुमत न मिळाल्याने भाजपलाही शिवसेनेच्या 9 खासदारांचा भविष्यात आधार मिळू शकतो अशी आशा वाटते आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर दबाव ठेवण्यासाठी ठाकरेंची वाढती जवळीक उपयोगी वाटत असेल असंही अभय देशपांडे सांगतात.  

कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षानी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार.

संजय राऊत

नेते शिवसेना

शरद पवारांना नेमकं काय हवंय?

विधानसभा निवडणुकीत बसलेल्या तडाख्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणेच शरद पवारांच्या  राष्ट्रवादी काँग्रेस समोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा आहे. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले असेल तरी त्यांच्याकडे केवळ एक खासदार आहेत. त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी शरद पवार यांच्या गटातील खासदारांना आपल्याकडे आणण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवलेले प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी भाजपा विरोधात आक्रमक भूमिका न घेता सुसंवाद ठेवण्याचा व त्याद्वारे अडचणीच्या काळात आपला पक्ष टिकविण्याचा पवार यांचा प्रयत्न दिसतो आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आधी ही स्वबळावर लढल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यात काही नवीन आहे असं म्हणता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना न्याय मिळालाच पाहीजे.

सुप्रिया सुळे

खासदार, राशप

यामुळे केंद्र सरकार बळकट होईल का? 

2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत न मिळवता आल्याने भाजपाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांवर अवलंबून राहावे लागते आहे. अशावेळी त्यातील एखाद्या पक्षाने भविष्यात वेगळी भूमिका घेतली तर पर्याय म्हणून काही पक्षांना, खासदारांना आपल्या सोबत घेण्याचा "प्लॅन बी" भाजपाने तयार ठेवला आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालवल्याचे दिसते आहे. या प्लॅन बी मध्ये 8 खासदार असणारे शरद पवार व 9 खासदार असलेले उद्धव ठाकरे हे ही असतील तर आश्चर्य वाटायला नको असं देशपांडे सांगतात.  

ठाकरे आणि पवार हे भाजपसाठी नितीश- चंद्राबाबू यांच्यापेक्षा अधिक विश्वासार्ह वाटतात का ?

नितीशकुमार यांनी अनेकदा आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळेच विरोधक त्यांचा "पलटूराम" असा उल्लेख करतात. चंद्राबाबू नायडू यांनीही यापूर्वी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. दोघांचेही राजकारण बेभरवशाचे राहिले आहे. भाजपासोबत असतानाही, भाजपाच्या हिंदुत्वाची भूमिका त्यांनी आजवर स्वीकारलेली नाही. त्यामुळे भविष्यात एखाद्या मुद्द्यावर मतभेद झाले तर हे दोघेही केव्हाही पलटी मारू शकतात. तुलनेत पक्ष फुटल्याने दुर्बल झालेले व अस्तित्वासाठी झुंजणारे राष्ट्रवादीत व शिवसेना विश्वासार्ह नाही तरी " मँनेजेबल" वाटत असतील असं अभय देशपांडे सांगता. शिवसेनेची मूळ भूमिका तर हिंदुत्वाची होती. त्यामुळे जवळीक वाटत असावी .
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com