योगेश शिरसाट, अकोला
अकोला जिल्ह्यातील राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हिदायत पटेल यांच्यावर आकोट तालुक्यातील मोहाळा गावी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
एका माथेफिरूने पटेल यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता पसरली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कशी घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे मोहाळा गावात असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने चाकूने पटेल यांच्या पोटात आणि मानेवर दोन ते तीन गंभीर वार केले. हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पटेल जागीच कोसळले.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
या घटनेचा एक थरारक व्हिडिओ देखील समोर आला असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अकोटवरून अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच आकोट पोलिसांनी तातडीने हालचाली करून हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, या हल्याचे नेमके कारण काय होते? हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला की यामागे काही राजकीय षडयंत्र आहे? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
काँग्रेसवर शोककळा
हिदायत पटेल यांच्या मृत्यूची बातमी समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. संपूर्ण राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहाळा गावात आणि आकोट शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world