आकाश सावंत / लक्ष्मण सोळुंके, बीड
मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा एक गंभीर कट उघडकीस आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांची डील झाली होती. या प्रकरणी जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीडमधून दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत. यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एका मोठ्या राजकीय नेत्याने जरांगे पाटील यांना संपवण्याचा हा कट रचल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे.
(नक्की वाचा- VIDEO: 'लग्न साधं केलं तरी पोरं होतात', मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदोरीकर महाराज ट्रोल)
काय आहे प्रकरण?
जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या बैठकांमध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश होता. हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळाल्यानंतर जरांगे पाटील यांच्या टीममधील गंगाधर काळकुटे यांनी तातडीने जालना पोलीस अधीक्षक यांना तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री उशिरा बीडमध्ये धडक देऊन दोघांना ताब्यात घेतले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली. पोलीस सध्या ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. हा कट नेमका कोणत्या राजकीय नेत्याने रचला, या कटामागील नेमका उद्देश काय होता आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
(नक्की वाचा- Jemimah Rodrigues: जेमिमाह रॉड्रिग्सने वांद्रे सोडून नवी मुंबईत घेतलं नवीन घर, कारण वाचून अभिमान वाटेल!)
मराठा आंदोलनाचे नेते असलेल्या जरांगे पाटलांना अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी आणि हत्येचा कट रचल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करून त्वरीत कारवाई केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world