प्रतीक राठोड, यवतमाळ
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आणि निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी 'टार्गेट पीक अप्स' संस्थेमार्फत सुमारे 24 विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन सराव मोहीम राबवण्यात येत होती. मात्र, याच संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या इयत्ता 8 वीच्या दुसऱ्या ऑनलाइन सराव चाचणीच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रश्नपत्रिकेतील आक्षेपार्ह प्रश्न
ऑनलाइन प्रश्नपत्रिकेतील प्रश्नावलीत 'उच्च जातीचे नाव काय? असा थेट प्रश्न विचारण्यात आला. शिष्यवृत्तीसारख्या शासकीय परीक्षेच्या सरावासाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत असा जातीयवादी प्रश्न विचारल्याबद्दल शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Yavatmal News
(नक्की वाचा- Viral: 'क्रूझ'वर काम करणाऱ्या पठ्ठ्याने खरेदी केली 10 लाखांची कार; पण पगारातील एक रुपयाही खर्च केला नाही)
अशा प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर जातीय भेदभावाचे विचार बिंबवले जातील, अशी भीती व्यक्त करत शिक्षकांनी 'विद्यार्थ्यांच्या मनातून जातीय निर्मूलन कसे करणार?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा सराव सुरू असतानाच हा प्रकार समोर आल्याने शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवला खुलासा
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मंदार पत्की यांनी तातडीने दखल घेतली आहे. पत्की यांनी सांगितले की, या प्रश्नाची ठेवण आणि वापरलेली भाषा पूर्णपणे चुकीची आणि आक्षेपार्ह आहे. संबंधित 'टार्गेट पीक अप्स' संस्थेकडून त्यांनी या प्रश्नासंदर्भात लेखी खुलासा मागवला आहे. हा खुलासा आल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.