लक्ष्मण सोळुंके, जालना
जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रबोधिनीत क्रीडा शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप क्रीडा शिक्षक तथा व्यवस्थापक प्रमोद खरात याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये पोलीस आणि शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीनंतर अखेर प्रमोद खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जालना शहरातील या क्रीडा प्रबोधिनीमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. याच ठिकाणी प्रमोद खरात हा क्रीडा शिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याला क्रीडा शिक्षणाच्या नावाखाली येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती.
(नक्की वाचा- Jalgaon News: जळगाव हादरले! पोलीस स्टेशनमध्येच 3 तरुणांचा अनैसर्गिक लैंगिक छळ; PSI निलंबित)
या गोपनीय माहितीनंतर, शिक्षण विभागाने या प्रकरणाची शनिवारी चौकशी केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी स्वतः पीडित मुलींची चौकशी केली. या सखोल चौकशीनंतर, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रमोद खरातला बेड्या ठोकल्या.
(नक्की वाचा- Kolhapur News: बाहुली,गुलाल अन् लोखंडी खिळे! सोडचिट्टीसाठी स्मशानभूमीत काळी जादू)
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव या करत असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. अशा घटनांमुळे क्रीडा क्षेत्रातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.