योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणात तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणातील आठही आरोपी पोलीस कोठडीत असून, मंगळवारी अकोला पोलिसांनी आरोपींना सोबत घेत घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींकडून अक्षय नागलकरची हत्या नेमकी कशी झाली, हत्या झाल्यानंतर मृतदेह कुठे नेण्यात आला आणि पुरावे कसे नष्ट करण्यात आले, याची सविस्तर परेड घेण्यात आली.
दरम्यान, आरोपींनी चौकशीत अक्षय नागलकरचा मोबाईल मोर्णा नदीच्या पात्रात फेकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने गोताखोर नदीत उतरले असून मोबाईल व इतर पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार असून, त्याचा शोध मोबाईल लोकेशनच्या आधारे सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते.
हत्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र, तपास अधिक गतीमान करण्यात आला असून मृतदेह जाळलेल्या ठिकाणासह हत्या झालेल्या स्थळाची आरोपींकडून पुनरावृत्ती करण्यात आली. तसेच मृतदेहाची राख कुठे फेकण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.
नक्की वाचा - Akola News : भरबाजारात मृतदेह आढळल्याने खळबळ; चेहऱ्याची भयाण अवस्था, जिल्ह्यात भीतीचं सावट
मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकरचा गुन्हेगारी इतिहास उघड..!
बहुचर्चित अक्षय नागलकर हत्या या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर याचा गुन्हेगारी इतिहास पोलीस तपासात समोर येत आहे. दोन दशकांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून झालेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात बोरकर हा मुख्य सूत्रधार होता. त्यानंतर वाशिम बायपास येथे हवेत गोळीबार करणे, अवैध क्लब चालवणे, त्या क्लबवर विद्युत चोरी करणे, तसेच ‘व्हीआयपी' लिहिलेल्या गाडीत फिरणे अशा प्रकारच्या कृत्यांत तो अनेकदा सापडला आहे.
याशिवाय, एका जुन्या शहरातील तरुणीला छेडछाड केल्याने त्या तरुणीने आत्महत्या केली होती, या प्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. एवढेच नाही तर अनेकांना व्याजाने पैसे देऊन परत न दिल्यास जीवघेणी धमकी देणे, खंडणी मागणे आणि जुगाराचे अड्डे चालवणे अशा अनेक गुन्ह्यांत तो आधीपासूनच आरोपी आहे. आता पोलीस अशा संघटित गुन्हेगारी जगतात 'कुप्रसिध्द' असलेल्या अटल गुन्हेगार चंद्रकांत बोरकरवर 'मकोका' सह इतर कायद्यानुसार कारवाई करतील का? हा प्रश्न सामान्य अकोलेकरांकडून विचारला जात आहे. तर दुसरीकडे अक्षय नागलकर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आणखी तपासाची गती वाढवली असली तरी सखोल तपास केल्यानंतर या प्रकरणात लवकरच महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.