सौरभ वाघमारे, सोलापूर
डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांची मजल आता किती वाढली आहे, याचे ज्वलंत उदाहरण सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. सोलापूरचे पोलीस अधीक्षक (SP) अतुल कुलकर्णी यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
स्वतः पोलीस अधीक्षकांनीच या प्रकाराबाबत व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या (SP) नावानेच भामट्यांनी खोटे फेसबुक खाते उघडून प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे.
काय आहे नेमका प्रकार?
सायबर भामट्यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा फोटो आणि नाव वापरून एक बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केले. या बनावट खात्यावरून ओळखीच्या लोकांना 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवून किंवा मेसेजद्वारे मदतीची किंवा पैशांची मागणी केली जाण्याची दाट शक्यता होती. मात्र, हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
(नक्की वाचा- Rain Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट! 26 जानेवारीपर्यंत 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत)
Sopalur News
पोलीस अधीक्षकांकडून नागरिकांना आवाहन
स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर बनावट खात्याचा स्क्रीनशॉट शेअर करत माहिती दिली. माझ्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट फेसबुक खात्यावरून कोणाला मेसेज आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नका. अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका. नागरिकांनी असे संशयास्पद खाते आढळल्यास तातडीने सायबर पोलिसांना कळवावे, असं अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल)
सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
सोलापूर सायबर पोलीस या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास करत आहेत. तांत्रिक तपासाद्वारे हे खाते कोठून आणि कोणत्या आयपी (IP) ॲड्रेसवरून हाताळले जात आहे, याचा शोध घेतला जात आहे. पोलीस प्रशासनाच्या नावे अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी कडक कायदेशीर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.