DCM Eknath Shinde Dussehra Melava Speech : बाळासाहेब असते तर त्यांनी देखील आपल्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती. बळीराजाला वाचवण्यासाठी हा निर्णय आपण घेतला. या पूरात पाऊस वैऱ्यासारखा कोसळला. परिस्थिती भयानक आहे मग अशा परिस्थितीत त्याला मदतीचा हात द्यायचा नाही..मग कधी मदत करायची.. सरकारदेखील त्यांच्या पाठिशी खंबीर उभं राहील. जेव्हा जेव्हा दुष्काळ आला, त्या त्या वेळी आपल्या शेकऱ्यांना अन्नधान्य, पाणी आणि जीवनावश्यक पाणी शिवसेनेनं दिलं. माझ्या लाडक्या शेकऱ्यांना माझी एव्हढीच विनंती आहे, तुम्ही धीर सोडू नको. तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका. तुमचे भाऊ ईकडे आहेत. तुमचं उद्ध्वस्त झालेल्या जीवनाला सरकार उभारी दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कारण मी देखील एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मला माहित आहेत. आपल्या पूरग्रस्तांची शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या पूर्वी त्यांना मदत दिली जाईल. हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात केलं. ते गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसैनिकांना संबोधीत करताना बोलत होते.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा करण्याची आपली परंपरा आहे. पण यावेळी आपला बळीराजा संकटात आहे. ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन दसरा मेळावा साजरा करावा,असं कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा मुंबई-ठाणेपुरता मर्यादित केला. मी शेतकऱ्यांचं दु:ख डोळ्याने पाहिलं आहे.
बळीराजाच्या घरांची पडझड झाली आहे. मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो आणि त्यांना मदतीचा हात दिला. महापूरात बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पण सरकार त्यांच्या पाठिशी आहे. बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे,80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण..हा गुरुमंत्र, मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला दिलाय. आपण एक व्रत कधीही सोडलं नाही आणि कधीही सोडणार नाही. जिथे संकट तिथे शिवसेना..जिथे आपत्ती तिथे शिवसेना..जिथे संकट तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे..
"मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना काम करते.ही आपली जबाबदारी आहे. महापूरामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पण आपण सर्व त्यांच्या पाठिशी आहोत. आपण त्यांच्या मागे आहोत. सरकार त्यांच्या मागे आहे. कोणत्याही अटी शर्थी बाजूला ठेऊन यावेळीही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वांनी ठरवलंय,कोणत्याही परिस्थितीत बळीराजाला मदतीला हात दिला पाहिजे.
या परिस्थितीत संकट मोठं आहे. अनेक वर्षात कधी एवढा पाऊस आम्ही पाहिलं नाही. अनेक वर्ष आम्ही एवढं संकट पाहिलं नाही. अशा परिस्थितीत आपण त्यांच्या मागे उभे राहिलो पाहिजे. दसरा सण मोठा..आनंदाला नाही तोटा, असं आपण म्हणतो. पण यावेळी दसऱ्यावर पूराचं सावट आहे. अशा परिस्थिती आपला अन्नदाता त्याच्या पाठिशी उभं राहण्याचं काम शिवसेना करते आहे", असंही एकनथ शिंदे म्हणाले.