CIDCO Housing Price News: महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधी सिडको सोडतधारकांना मोठी भेट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोच्या घरांच्या वाढीव किमतीबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता विराम मिळण्याची चिन्हे आहेत. नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सिडको घरांच्या दरांबाबत अधिकृत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार श्री. शशिकांत शिंदे, आमदार श्री. विक्रांत बाळासाहेब पाटील, नगरविकास खात्याचे मुख्य सचिव श्री. असीम गुप्ता आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Mumbai News: मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत मोठा निर्णय! राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
सिडको घरांच्या दरांवरून निर्माण झाली होती तीव्र नाराजी
सिडकोमार्फत ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर (ऑक्टोबर २०२४)' या योजनेत विविध नोडमध्ये काढण्यात आलेल्या लॉटरीमधील घरांच्या अवाजवी किमतींमुळे गेल्या काही महिन्यांपासून सोडतधारकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता.या विरोधात अनेक वेळा मोर्चे, निदर्शने आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचे प्रकार झाले. तरीदेखील सिडको प्रशासन आणि नगरविकास खात्याकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला होता.
आमदारांकडून विधिमंडळात लक्षवेधी
या विषयावर १० जुलै २०२५ रोजी विधान परिषद आमदार श्री. शशिकांत शिंदे आणि आमदार श्री. विक्रांत पाटील यांनी विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सिडकोच्या गृहधोरणाबाबत तसेच वाढीव किमतींवर शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळीही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता.
गेल्या महिन्यात वाशी येथे झालेल्या स्व. आण्णासाहेब पाटील जयंती कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घरांच्या दरांबाबत लवकरच बैठक घेण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनीदेखील “सिडको घरांच्या किमतीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल,” असे स्पष्ट केले होते. यावेळी त्यांनी पोलिस गृहनिर्माण योजनेतील घरांची किंमत ५० लाखांवरून १५ लाखांपर्यंत कमी केल्याचा दाखलाही दिला होता.
आरटीआय माहितीने दिला नवा आधार
आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार सिडकोच्या अंतर्गत सर्वेक्षणात घरांच्या मूळ किमती सध्याच्या घोषित दरांपेक्षा ३० ते ५० टक्क्यांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये आता घरांच्या दरात मोठी कपात होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमुळे सिडको सोडतधारकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही बैठक निश्चित झाल्याने "दिवाळीनंतरची आणखी एक दिवाळी" असा माहोल निर्माण झाला आहे.
महानगरपालिका तसेच राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत सिडको घरांच्या दरांमध्ये मोठी कपात जाहीर झाल्यास राज्यातील लाखो सोडतधारकांना दिलासा मिळणार असून, शासनाविषयीचा विश्वास आणखी दृढ होण्याची शक्यता आहे.