Rohad village : कुटुंबातील 'होम मिनिस्टर'ने ठरवलं अन् गावात दारूबंदी लागू; धुळ्यातील या गावाची राज्यभरात चर्चा

गावात दारूविक्रीमुळे अनेक सामाजिक आणि कुटुंबातील प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महिलांनी एकजूट दाखवत गावात दारूबंदी करण्याचा निर्धार केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील रोहोड येथे दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी एकत्र येत ठोस पाऊल उचललं आहे. गावात दारूविक्रीमुळे अनेक सामाजिक आणि कुटुंबातील प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे महिलांनी एकजूट दाखवत गावात दारूबंदी करण्याचा निर्धार केला आहे. ग्रामपंचायत सरपंच कल्पना राऊत, उपसरपंच वैशाली चौरे व ग्रामविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गावात दारूबंदी लागू करण्याची मागणी करण्यात आली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

29 मे रोजी झालेल्या ग्रामसभेत देखील आधीच या दारूबंदी संदर्भात ठराव करण्यात आला होता आणि कालपासून गावात दारूबंदी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयानंतर गावातील महिलांनी ठाम भूमिका घेत दारूबंदी झालीच पाहिजे, नारीशक्तीचा विजय असो, अशा घोषणा देत गावात रॅली काढली.

Advertisement

नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश

रॅलीत सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह आणि आत्मविश्वास विशेष लक्षवेधी ठरला. महिलांनी एकत्र येत गावाला व्यसनमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान स्थानिक पोलीस प्रशासनाला ग्रामसभेचा ठराव लागू करण्याची विनंती करण्यात आली. गावात दारूबंदी लागू झाल्यास ग्रामस्थांचे आरोग्य, कुटुंबातील शांती आणि एकोप्याचे वातावरण टिकेल, असे महिलांचे मत होते. दारूबंदीच्या माध्यमातून गावाला व्यसनमुक्त करण्याचा निर्धार सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे. त्यांच्या या पुढाकाराने समाजात नवा आदर्श निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.