सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळा प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून तातडीने प्रशासक नेमण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सहा शाखांमध्ये 2 कोटी 43 लाखांचा घोटाळा शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुष्काळ व अवकाळी पाऊस निधीवर हा डल्ला मारण्यात आला आहे. या सर्व प्रकारावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकून केली आहे. कुंपणच शेत खाण्याचा हा सर्व प्रकार आहे. याआधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाकडून नोकर भरतीसह मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. त्याची सहकार विभागाकडून आपण चौकशी देखील लावली आहे. सध्या ही चौकशी सुरू आहे.
(नक्की वाचा- वाचा - चहा पिण्याची तलफ अन् लाखोंचा गंडा; तात्यासाहेबांचं 'ते' स्वप्नही भंगलं! )
आता याच संचालक मंडळाच्या पाऊलावर पाऊल ठेवत बँकेतल्या शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून देखील घोटाळे करण्यात आले आहेत. आता त्या बँकेच्या शाखांची चौकशी बँकेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र घोटाळे करणाऱ्यांकडूनच घोटाळ्याची चौकशी करण्यात येत आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून सहकार विभागाच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. तसेच वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या देखील कराव्यात, अशी देखील मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
(नक्की वाचा- मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 30 मेपासून पाणी कपात, मनपाने केले हे आवाहन)
सांगली जिल्हा बँकेचे 8 जण निलंबित
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एकूण 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. 219 शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम देखील सुरू आहे. त्यामुळे तपासणीनंतर दुष्काळ आणि अवकाळी निधीवर मारण्यात आलेला डल्ल्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.