शपथविधी सोहळ्यापूर्वी मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन

या शपथविधी सोहळ्याला अमित शाहांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अखेर आज तब्बल 12 दिवसांनी महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी पार पडणार आहे. त्यामुळे राज्यभरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आजचा दिवस देवेंद्र फडणवीसांसाठी खास आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यानंतर अडीच वर्षांपूर्वीही हुकलेला शपथविधी अखेर आज होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज सकाळी सिद्धीविनायकाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. येथे ते गणेशाच्या चरणी नतमस्तक झाले. यानंतर ते मुंबादेवीला जाणार असल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - भाजपची यशस्वी मध्यस्थी! आज एकनाथ शिंदेंचाही शपथविधी; 'ही' महत्वाची खाती मिळणार?

आज सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. याची जय्यत तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्याला अमित शाहांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. याशिवाय संत-महंतांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी विरोधकांनाही बोलावण्यात आलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार यांना फोन केला आणि शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिल्याची  माहिती समोर आली आहे. मात्र संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना कळवलं आहे. त्याशिवाय फडणवीसांनी राज ठाकरेंनाही फोन करून शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. राज ठाकरे उपस्थित राहणार की नाही हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. 

महायुती सरकारच्या आजच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा तिघांचाच शपथविधी होणार आहे. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यामध्ये 30 हून अधिक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी नेते अनिल पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

Advertisement