
मुंबई: विधानसभा निवडणुकांंमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ुपार पडत आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर होत असलेल्या या भव्य सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित आहे. मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे शिंदे नेमके सत्तेत सहभागी होणार का? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम होता. यामध्ये आता महत्वाची अपडेट समोर आली आहे.
गृहमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये सुरु झालेला अंतर्गत कलह अखेर संपल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असून ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल, अशी महत्वाची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांना यासंबंधीचे पत्रही देण्यात आलं आहे.
महायुती सरकारचा इतर मंत्र्यांच्या शपथविधीसह मंत्रिमंडळ विस्तार हा नागपूर अधिवेशनाआधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहमतीनेच इतर मंत्र्यांचा शपथविधी पुन्हा पुढील काही दिवसात घेण्याचे एकमताने ठरल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षासह शिंदेसेनेच्या नेत्यांनीही एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा आग्रह केला होता.
अखेर आता त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी महसूल खाते तसेच नगर विकास खाते हे शिवसेना शिंदे सेनेकडे जाण्याची शक्यता आहे. आता नागपूर अधिवेशनाआधी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाची बातमी: भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रिपदी निवड का झाली? 5 महत्त्वाची कारणं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world