सुनील दवंगे, शिर्डी
शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारात देश-विदेशातील कोट्यवधी भाविक नतमस्तक होतात. साईबाबा आपल्या भक्तांच्या मनातील प्रत्येक शुद्ध इच्छा पूर्ण करतात, अशी भाविकांची अढळ श्रद्धा आहे. आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर अनेक भक्त बाबांच्या चरणी यथाशक्ती दान अर्पण करत असतात. असाच एक सुवर्ण दान देणारा अनुभव नुकताच शिर्डीत पाहायला मिळाला. जिथे मध्य प्रदेशातील एका भक्ताने तब्बल 20 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण केला आहे.
इच्छापूर्तीनंतर कृतज्ञतेचे दान
मध्य प्रदेश राज्यातील हरदासपूर येथे राहणारे साईभक्त तेज बहादूर सिंह यांनी साईबाबांकडे एक नवस केला होता. त्यांची ही मनातील इच्छा पूर्ण झाल्याने, त्यांनी मोठ्या भक्तिभावाने बाबांच्या चरणी हा सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचे ठरवले. हा मुकुट केवळ मौल्यवान धातूचा नसून, त्यावर अतिशय कलात्मक आणि नक्षीकाम करण्यात आले आहे, जे पाहताच डोळ्यांचे पारणे फुटते.
साईबाबांच्या मूर्तीसाठी विशेषतः तयार करण्यात आलेला हा मुकूट जवळपास 200 ग्रॅम शुद्ध सोन्याचा आहे. त्यावर आकर्षक आणि कलात्मक पारंपरिक नक्षीकाम करण्यात आलं आहे. सोन्याच्या चालू दरासह या मुकुटाची किंमत साधारण 20 लाख 16 हजार इतकी आहे.
(नक्की वाचा- Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)
साईबाबा संस्थानकडून सत्कार
तेज बहादूर सिंह यांनी हा मुकुट अधिकृतपणे श्री साईबाबा संस्थानकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी या दानशूर भक्ताचे स्वागत केले. दराडे यांनी तेज बहादूर सिंह यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला आणि साईबाबांवरील त्यांच्या या अढळ श्रद्धेबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
शिर्डीमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि रोख रक्कम दान केली जाते. हे दान केवळ संपत्तीचे प्रदर्शन नसून, भक्तांचे साईबाबांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. तेज बहादूर सिंह यांच्या या सुवर्ण दानामुळे साईदरबारातील झळाळी अधिकच वाढली असून, इतर भाविकांमध्येही श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.