NCP Statement on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळावरुन विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. अनेक नेत्यांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. पंकजा मुंडेंनीही धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत आपलं मत व्यक्त केलं. आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचं किंवा आमच्या नेत्यांचं समर्थन असणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. निवेदन पत्रिकेत त्यांनी लिहिलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रारंभापासूनच अशी स्पष्ट भूमिका राहिली आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे.
नक्की वाचा - Pankaja Munde : 'धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता'; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
आज धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो तसाच चालू राहून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचं तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.