ओंकार कुलकर्णी, धाराशिव
Dharashiv News: कर्तव्य आणि जबाबदारीसमोर वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून काम करण्याची उदाहरणे समाजात फार कमी दिसतात. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मैनक घोष यांनी अशा परिस्थितीतही आपल्या कर्तव्यनिष्ठेचे एक अनोखे उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवले आहे. वडिलांचे नुकतेच निधन झाले असताना आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी मैनक घोष यांनी पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी धाव घेतली, ज्यामुळे त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे पश्चिम बंगालचे असलेले मैनक घोष यांचे वडील माणिकराव घोष हे त्यांच्यासोबत धाराशिव येथे वास्तव्याला होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात दक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, 27 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर, सोलापूर येथील विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैयक्तिक आयुष्यात इतका मोठा आघात होऊनही, मैनक घोष यांनी आपले दुःख बाजूला सारले.
(नक्की वाचा- Solapur Flood: फोन केला, फजिती झाली! पूरग्रस्तांसमोरच कलेक्टरने शिंदे गटाच्या नेत्याला झापलं, पाहा VIDEO)
Mainak Ghosh
तुळजापूर आणि जिल्ह्यातील इतर भागांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा नाजूक परिस्थितीत, प्रशासकीय प्रमुख म्हणून सीईओ घोष यांनी आपले वैयक्तिक दुःख विसरून, पूरग्रस्तांच्या मदतीला प्राथमिकता दिली. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी त्यांनी तुळजापूर येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
(नक्की वाचा- गरबा खेळली अन् मध्यरात्री घरी निघाली, रस्त्यात एकटीला पाहून Rapido ड्रायव्हरने जे केलं..तरुणीनं व्हिडीओच बनवला)
आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी तातडीने मदतकार्यात भाग घेतला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या या कार्यतत्पर भूमिकेमुळे आणि जबाबदारीच्या जाणिवेमुळे सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी अशा सर्व स्तरांतून मैनक घोष यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचे हे कृत्य केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील नागरिक म्हणून इतरांना प्रेरणा देणारे ठरले आहे.