ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dharashiv Land Fraud: गरजेपोटी लिहून दिलेल्या जमिनीची परस्पर विक्री करत सावकाराने शेतकरी कुटुंबाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमधून उघडकीस आला आहे. सावकाराने बळकावलेली ही जमिन सोडवण्यासाठी शेतकरी कुटुंबाची धडपड सुरु असून त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कार्ला गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या आडेकर या शेतकरी कुटुंबाची वडिलोपार्जित अडीच एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गरजेपोटी सावकाराला लिहून दिलेली जमीन विश्वासघात करून दुसऱ्याच्या नावे विकल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
Beed News : होळीचा आनंद क्षणात विरला; कृष्णाचा भयंकर शेवट, मित्रांना जबर धक्का!
आपली जमीन हातची जाऊ नये म्हणून नवनाथ आडेकर यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी अर्ज सादर केला आहे. सावकाराने नियोजनपूर्वक डाव रचून जमीन बळकावल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडून ताबा देण्यासाठी दमदाटी होत असल्याचाही आरोप आडेकर कुटुंबाने केला आहे.
जमिन परत मिळवण्यासाठी धडपड!
आपली व्यथा मांडताना कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आणि “आमची जमीन आम्हाला परत मिळावी,” अशी आर्त मागणी त्यांनी केली. या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करणार, शेतकरी कुटुंबाला न्याय मिळणार का, आणि सावकारीच्या विळख्यातून सुटका कधी होणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.