Kalyan News: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात एका कैद्याची भेट घडवून देण्यासाठी चक्क लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून दोन कारागृह कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले असून या कारवाईमुळे संपूर्ण जेल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी कामासाठी किंवा कैद्यांच्या सुविधेसाठी पैशांची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे या कारवाईमुळे दणाणले आहेत.
काय आहे प्रकरण?
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात अनेक कैदी शिक्षा भोगत आहेत किंवा न्यायालयीन कोठडीत आहेत. नियमानुसार कैद्यांच्या नातेवाईकांना त्यांची भेट घेता येते. मात्र, कारागृहात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी याच भेटीचा फायदा घेण्याचे ठरवले.
एका कैद्याची त्याच्या नातेवाईकांशी भेट घडवून आणण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी 1500 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. हक्काच्या भेटीसाठी अशा प्रकारे पैसे मागितल्याने नातेवाईकांनी या भ्रष्टाचाराला बळी न पडता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
(नक्की वाचा : Pune News : आधी चारित्र्यावर शिंतोडे, मग DNA चाचणी आणि अखेर अंगावर काटा आणणारा निकाल; 'या' प्रकरणाने सर्व हादरले )
कशी झाली कारवाई?
नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत ठाणे अँटी करप्शन ब्युरोने या प्रकरणाची पडताळणी केली. तक्रारीत तथ्य असल्याचे आढळताच अधिकाऱ्यांनी आधारवाडी जेल परिसरात सापळा रचला. शरद पानपाटील आणि सतीश भोसले अशी या दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ठरल्याप्रमाणे जेव्हा तक्रारदार नातेवाईक या कर्मचाऱ्यांना 1500 रुपये देण्यासाठी पोहोचले, तेव्हा ही लाचेची रक्कम स्वीकारताना अँटी करप्शनच्या टीमने या दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे कारागृह परिसरात एकच गोंधळ उडाला.
( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )
या कारवाईनंतर ठाणे अँटी करप्शन ब्युरोने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी कल्याणमधील खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणी जिथे सुरक्षा आणि शिस्त अत्यंत महत्त्वाची असते, तिथेच अशा प्रकारे लाचखोरीचे प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आणखी कोणाचे यात हात आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world