ओंकार कुलकर्णी, तुळजापूर: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. तुळजाभवानी मंदिरातील ब्रह्मदेवाच्या मूर्तीला तडे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याप्रकरणी मंदिराचे विश्वस्त तसेच महंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता तुळजापूर मंदिर संस्थानाच्या कार्यालयात दारु पिऊन धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजारी अनुप कदम यांनी मद्यपान करून तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत, गोंधळ घालत तोडफोड केली.
यावर मंदिर संस्थान कडून त्यांच्यावर तुळजापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजारी अनुप कदम यांनी 13 एप्रिल 2025 रोजी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदिरात प्रवेश करत मंदिर संस्थान मधील अधिकाऱ्यांशी वाद घातला होता.
(नक्की वाचा- Bhushan Gavai : न्यायमूर्ती भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश, घेतली पदाची शपथ)
याच अनुषंगाने मंदिर संस्थान कडून 12 मे रोजी कदम यांना नोटीस बजावण्यात आली होती यावर संतप्त होत पुजाऱ्याकडून तोडफोड केल्याने पुजारी कदम यांच्या विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 221, 352, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.