ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dharashiv News: विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवच्या वाशी तालुक्यातून समोर आला आहे. वाशी तालुक्याच्या पारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोषण आहारातील भातामध्ये अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारानंतर पालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने अन्नाचे नमुने जप्त केले आहेत.
Barkha Trehan: अभिजीत दीपकेवर शाई फेकणारी बरखा त्रैहन कोण? थेट अत्याचारातील आरोपीशी आहे कनेक्शन
चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ...!
समोर आलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील 321 पटसंख्या असलेल्या पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पारा येथे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारच्या जेवणासाठी वाढण्यात आलेल्या सोयाबीन-भातामध्ये अळ्या आढळून आल्याने विद्यार्थ्यांनी जेवण न करता घरी डबे घेऊन गेल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त करत तक्रार केली.
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा शाळेत जाऊन पोषण आहाराची तपासणी केली. यावेळी केवळ शिजवलेल्या भातातच नव्हे तर शाळेत साठवून ठेवलेल्या इतर पोषण आहाराच्या साहित्यातही अळ्या आढळल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी अन्नाचे नमुने घेत उर्वरित पोषण आहार जप्त केला असून हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असती तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवालही पालकांनी उपस्थित केला आहे.