ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dharashiv ZP Election 2026: धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी संदेश चव्हाण यांची निवड झाली आहे. अशातच आता 15 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचा अध्यक्षपदावरही दावा केल्याने मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या दाव्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे टेन्शन वाढले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विकी चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने ही निवड झाल्याची माहिती समोर आली असून या निवडीमुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची राजकीय ताकद अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.
अशातच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदावरही शिवसेना दावा करणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. अध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गटनेते म्हणून विकी चव्हाण हे सभागृहात पक्षाचा व्हीप जारी करणे तसेच पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.
शिंदे गटाचा अध्यक्षपदावरही दावा
त्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंत, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची बैठक पार पडली असून जिल्ह्यात शिवसेना एकसंधपणे काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे 15 सदस्य विजयी झाले आहेत.
त्यासोबतच अध्यक्षपदासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्वाधिक 19 जागा जिंकणाऱ्या भाजपसमोर आता सत्तास्थापनेचे गणित अधिकच गुंतागुंतीचे झाले असून अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात भयंकर घटना! 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीने जीवन संपवलं, सुसाईड नोटमुळे उडाली खळबळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world