- नागिंद मोरे, धुळे
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एक वर्षाच्या चिमुकलचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. धुळे शहरातील देवपूर भागातील बोरसे नगरातील ही घटना आहे. पत्र्याच्या शेडमध्ये एक वर्षाची चिमुकली झोपलेली असताना मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करत लचके तोडले. दरम्यान यानंतर चिमुकलीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
(नक्की: शेतकऱ्याच्या व्हाट्सअॅप स्टेटसची कमाल, चोरीला गेलेला बैल सापडला)
नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी तेजाप रहासे हे सध्या देवपुरातील बोरसे नगरामध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतात. पण ज्यावेळेस ही घटना त्यावेळेस घरामध्ये आई, पत्नी आणि त्यांचा मुलगा-मुलगी होते. आई-पत्नी प्रातःविधी करण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यावेळेस घरात एक वर्षाची खुशी आणि दोन वर्षांचा राहुल झोपले होते. यावेळेस त्यांच्या घरामध्ये अचानक कुत्रे शिरले आणि त्यांनी खुशीचे लचके तोडायला सुरुवात केली. आई-आजी घराकडे परतताच मोकाट कुत्रे खुशीचे लचके तोडत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी कुत्र्यांना हाकलले आणि खुशीला घेऊन तातडीने हॉस्पिटल गाठले.
(नक्की: वाळू चोरांना उपजिल्हाधिकारी हर्षलतांकडून चोप, कराटेचे प्रशिक्षण असे आले कामी)
उपचारादरम्यान सकाळी 11 वाजेदरम्यान खुशीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्याने चावा घेतल्यानंतर मिल परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाचा तसेच एका तरुणाचा रेबीज झाल्याने मृत्यू झाला होता. मोकाट कुत्र्यांचा विषय यापूर्वीही महापालिका सभागृहामध्ये मांडण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील आक्रमक झाले होते. पण अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. दर महिन्याला सुमारे 700हून अधिक नागरिकांना मोकाट कुत्रे हल्ला करत असल्याचे वृत्त समोर येते.
(नक्की: धक्कादायक! गुदद्वारात कॉम्प्रेसरने भरली हवा, लहान मुलासोबत घडला भयंकर प्रकार)