- धुळ्यातल्या मुस्लिम समाजाने गेल्या चाळीस वर्षांपासून हार कंगन तयार करून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे
- बाबुलाल अझमुद्दीन हलवाई यांच्या मुस्लिम परिवाराकडून होळी आणि गुढीपाडव्यासाठी हार कंगन विकले जातात
- दरवर्षी दीड टन हार कंगन तयार केला जातो आणि मुंबई, पालघर, बोईसरसह विविध भागात वितरित केला जातो
नागिंद मोरे
हिंदूंच्या सणाला गेल्या 40 वर्षांपासून धुळ्यातल्या मुस्लिम समाजाने हार-कंगन तयार करत हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे या सणाला विशेष असं महत्त्व आहे. रमजानचे रोजे ठेवूनही मुस्लिम बांधव हार कंगन बनवण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं. होळी आणि गुढीपाडवा हे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या सणासाठी हार कंगन हा पदार्थ महत्त्वाचा मानला जातो. मात्र हा पदार्थ तयार करण्यासाठी धुळ्यातल्या हलवाई परिवाराने चाळीस वर्षांची परंपरा राखली आहे. त्यांच्याकडूनच या हार कंगनाची खरेदी केली जाते. त्यांनी ही परंपरा आज ही कायम राखली आहे.
बाबुलाल अझमुद्दीन हलवाई या मुस्लिम परिवाराने गेल्या 40 वर्षांपासून वडिलोपार्जित हार कंगन तयार करण्याचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. विशेष म्हणजे या मुस्लिम परिवाराकडूनच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात हार कंगन खरेदी करतात. त्यामुळे या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला गेला आहे. रमजान सारखा पवित्र महिना सुरू असताना देखील हिंदू बांधवांच्या होळी आणि गुढीपाडवा या सणासाठी मुस्लिम कुटुंबीयाने कंबर कसली आहे.
जवळपास दीड टन माल या सणासाठी तयार करण्यात आला आहे. हा तयार करण्यात आलेला माल मुंबई, पालघर, बोईसर यांसह महाराष्ट्रातल्या विविध भागात जात असल्याची माहिती बाबूलाल हलवाई यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दीड टन मालाची निर्मिती केली असून 9 हजार क्विंटल व दीडशे रुपये किलो प्रमाणे हारकंगनची विक्री केली जात आहे. नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद या हार कंगन खरेदीला दिसून आला आहे. ही आता एक परंपराच धुळ्यात झाली आहे. ती इथले नागरिक ही तेवढ्याच आत्मियतेना पाळतात.
एकीकडे हिंदू मुस्लिम वादाच्या अनेक बातम्या आपण ऐकत असतो. रोज कुठे ना कुठे अशा बातम्या किंवा वाद झाल्याचं पाहायला ही मिळतं. पण धुळ्यात या अनोख्या परंपरेने हिंदू मुस्लिम ऐक्याचे उदाहरण सर्वां समोर ठेवले आहे. सर्व जण एक असतील तर खऱ्या अर्थाने सेफ असतील हेच या परंपरेतून दिसून येतं हिंदू सणासाठी त्यामुळेच इथले मुस्लिम झटत असल्याचं दिसून येत आहे. यात व्यवसाय हा भाग असला तरी त्या मागची भावना ही महत्वाची मानली पाहीजे असं ही हार कंगन कारागिर बाबुलाल अझमुद्दीन हे सांगतात.