सुनील दवंगे, प्रतिनिधी
Tukaram Mundhe News: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक कारवाईचा धसका सध्या संपूर्ण महाराष्ट्राने घेतला आहे. मात्र, अहिल्यानगर जिल्ह्यात एका मोठ्या दूध संकलन केंद्राने चक्क या कारवाईला आणि आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिर्डीजवळील सावळी विहीर येथील प्रसिद्ध साई जतीन दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत त्यांचा परवाना निलंबित केला होता. असे असतानाही, या केंद्रावर अजूनही राजरोसपणे दूध संकलन सुरूच असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शासकीय आदेशांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या या केंद्राला नक्की कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काय आहे प्रकरण?
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात मंचर येथील पराग डेअरीकडे पाठवण्यात आलेल्या दुधापासून झाली. साई जतीन दूध संकलन केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या 22 दूध टँकरची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान दुधामध्ये आणि प्रक्रियेत मोठ्या त्रुटी आढळल्या.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe तुकाराम मुंढेंची बदली होणार? मंत्र्यांच्या एका उत्तराने सर्व चर्चांना पूर्णविराम; वाचा काय घडलं )
दुधाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आणि या संकलन केंद्रावर थेट छापा टाकला. या छाप्यानंतर प्रशासनाने केंद्राचा दूध संकलनाचा परवाना तातडीने निलंबित केला होता.
अहिल्यानगर एफडीए कार्यालयाने या केंद्रावरील दूध संकलन तात्काळ बंद करण्याचे कडक आदेश दिले होते. मात्र, ग्राउंड रियालिटी अत्यंत वेगळी आणि चक्रावून टाकणारी आहे. या संकलन केंद्रावर दररोज सुमारे 30000 लिटर दूध संकलित केले जाते. याशिवाय इतर ठिकाणचे मिळून तब्बल 200000 लिटर दूध वितरित होत असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे केवळ राहाता तालुकाच नव्हे, तर शेजारच्या इतर जिल्ह्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर या केंद्रावर दूध येत आहे आणि परवाना रद्द झालेला असतानाही ते नेहमीप्रमाणे स्वीकारले जात आहे.
(नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची धडक मोहीम हायकोर्टात फेल, ऐतिहासिक गोरस भांडाराचा FDA विरुद्ध मोठा विजय )
तुकाराम मुंढेंच्या आदेशाला आव्हान?
राज्यभरात भेसळ करणारे आणि नियम मोडणारे व्यापारी सध्या एफडीएच्या भीतीने धास्तावलेले असताना अहिल्यानगरमधील हे केंद्र मात्र बिंधास्तपणे कार्यरत आहे. अधिकृत परवाना निलंबित झालेला असताना आणि संकलन बंद करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही केंद्र सुरू ठेवल्याने एफडीएच्या यंत्रणेवर आणि थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सरकारी नियमांची विनाकारण पायमल्ली करणाऱ्या या केंद्र चालकांवर आता प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अधिक सतर्क झाले असून या प्रकरणी पुढील तपास वेगाने सुरू करण्यात आला आहे. परवाना निलंबनाचा आदेश धुडकावून बेकायदेशीरपणे दूध संकलन सुरू ठेवल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध झाल्यास, संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल होण्याची आणि आणखी कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.