जाहिरात

Maharashtra Politics: मविआत रस्सीखेच, पण फडणवीसांची वेगळीच खेळी; विरोधी पक्षनेतेपद आदित्य ठाकरेंकडे जाणार?

Maharashtra Budget Session 2025: विरोधी पक्षनेते कुणाला करायचं यामागे देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाचा निर्णय घेतील. भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर अंकुश ठेवण्यासाठी आदित्य ठाकरेंची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. 

Maharashtra Politics: मविआत रस्सीखेच, पण फडणवीसांची वेगळीच खेळी; विरोधी पक्षनेतेपद आदित्य ठाकरेंकडे जाणार?

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अर्थसंकल्पाचा पहिलाच दिवस विरोधकांनी गाजवला. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याइतपतही संख्याबळ नाही तरीही यावरुन महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली असून तिन्ही पक्षांनी विरोधी पक्षनेतेद पदावर दावा केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेते पदावरुन कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार काँग्रेस पक्षाकडे 16 आमदार  आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडे दहा आमदार आहेत.. त्यामुळे विधानसभा सभागृहात  ठाकरेंच्या शिवसेनेचा संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे ठाकरे गट प्रबळ दावेदार मानले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटामध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी आघाडीवर आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडून दुजोरा मिळाला नसला तरी शिवसेना आमदारांची आदित्य ठाकरेंच्या नावाला पसंती दर्शवली आहे. आदित्य ठाकरे यांनीच हे पद घ्यावे, अशी ठाकरेंच्या आमदारांची मागणी आहे. आदित्य ठाकरेंकडे विरोधी पक्षनेतेपद गेल्यास पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड पाहायला मिळेल, एकनाथ शिंदे, अजित पवारांवर अंकुश ठेवता येईल. विरोधी पक्षनेतेपद आदित्य ठाकरेंकडे गेल्यास पक्षसंघटनेला बळकटी येईल, असे ठाकरेंच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

 यामध्ये सुनील प्रभू यांचेही नाव आघाडीवर आहे. सुनील प्रभूंना मुंबईतील राजकारणाची माहिती आहे, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी ठाकरे गटाची रणनिती आहे. सुनील प्रभूंप्रमाणेच भास्कर जाधव हे सुद्धा विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही आहेत. भास्कर जाधव यांना विधीमंडळ कामकाजाचा दांडगा अनुभव आहे, तसेच त्यांच्याकडे प्रभावीपणे प्रश्न मांडण्याची, सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याचीही कला आहे. त्यामुळे विरोधकांची बाजू मांडण्यासाठी भास्कर जाधव हे योग्य नाव आहे, अशीही ठाकरेंच्या गोटात चर्चा आहे. मात्र भास्कर जाधव यांनी अलिकडे घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांच्याकडे हे पद जाईल का? अशी शंका आहे. त्यांनी अलिकडे उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वावर शंका उपस्थित केल्याने त्यांना हे पद मिळेल का? असाही सवाल उपस्थित होत आहे. 

मात्र, या निवडीमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. राहुल नार्वेकर यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे राहील? याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही डाव टाकण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. त्यामुळे पडद्यामागे काही हालचाली सुरु आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षनेते कुणाला करायचं यामागे देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाचा निर्णय घेतील. भविष्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर अंकुश ठेवण्यासाठी आदित्य ठाकरेंची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. 

ट्रेंडिंग बातमी - MLA Salary: आमदारांना दर महिन्याला किती पगार मिळतो? आकडा ऐकाल तर म्हणाल...

दुसरीकडे, ठाकरेंची शिवसेना विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर दावा करत असेल तर विधान परिषदेवर काँग्रेस पक्ष दावा करेल अशी भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे त्यामुळे त्यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला जावा असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून मत मांडण्यात आले. 

यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही सांगण्यात आले आहे.  विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे नाव चर्चेत आहे... मात्र विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस आपलं विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाचे नाव जाहीर करेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: