Konkan Railway: मध्य रेल्वेने कोकणवासीयांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात बंद पडलेली दादर-दिवा पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी होत असताना, रेल्वे प्रशासनाने 15 ऑगस्टपासून सुरू केलेली दिवा-रोहा-चिपळूण मेमू रेल्वे आता कायमस्वरूपी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 25 वर्षांनंतर ही मागणी पूर्ण झाल्यामुळे, कोकणातील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि परवडणारा होणार आहे.
मेमू रेल्वेचे वेळापत्रक आणि मार्ग
या कायमस्वरूपी सेवेत दिवा ते चिपळूण आणि चिपळूण ते दिवा अशा दोन मेमू लोकल उपलब्ध असतील.दिवा-चिपळूण ही गाडी सकाळी 7.15 वाजता सुटेल. जी 6 ते 7 तासात चिपळूणला पोहोचेल.
तर चिपळूण ते दिवा ही गाडी दुपारी 12 वाजता चिपळूणमधून सुटेल. जी 6 ते 7 तासात दिवा येथे पोहोचेल. या सेवेमुळे सध्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवरील प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. 'सकाळ' वृत्तपत्राने याबाबतचं सविस्तर वृत प्रसिद्ध केले आहे.
(नक्की वाचा- Vande Bharat Express: पुणेकर, सांगलीकरांसाठी गुडन्यूज! 'वंदे भारत'ला दोन नवीन थांबे)
26 महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा
मेमू रेल्वे 26 स्थानकांवर थांबणार आहे. यात चिपळूण, खेड, वीर, माणगाव, इंदापूर, गोरेगाव, कोलाड, रोहा, पेण, पनवेल या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. कोकण रेल्वेमार्गावर दररोज 24 तासांत 26 प्रवासी एक्स्प्रेस गाड्या धावत असल्या तरी, चिपळूण स्थानकावर थांबणाऱ्या गाड्या रत्नागिरी, गोवा, कर्नाटक आणि केरळ येथून भरून येत असल्याने चिपळूणपुढील प्रवाशांना अनेकदा उभे राहून प्रवास करावा लागत होता.
(नक्की वाचा- वेळेवर ब्लाउज शिवला नाही; टेलरला तब्बल इतका दंड; ग्राहक आयोगाचा दणका)
दापोली, मंडणगड आणि गुहागरच्या प्रवाशांना फायदा
नवीन मेमू रेल्वेमुळे दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यातून येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. अनेक एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर आणि खेड येथे थांबे नसतात. त्यामुळे येथील प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी चिपळूणपर्यंत यावे लागते. तसेच, खेड तालुक्यातील 15 गावांचा परिसर आणि चिपळूणच्या पूर्व विभागातील सावर्डे परिसरातील नागरिकांनाही या मेमू रेल्वेमुळे थेट रेल्वे प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे.
या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची एक मोठी समस्या सुटली असून, कमी दरात जलद प्रवासाची सुविधा मिळाल्याने कोकणच्या पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.