योगेश शिरसाट, प्रतिनिधी अकोला
Akola News : दिवाळीच्या (Diwali 2025) उत्साहात संपूर्ण शहर प्रकाशमय झालेलं असतानाच जुन्या शहर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रसिद्ध सालासार मंदिरात चोरीची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली असून, मंदिरातील दानपेटी व काही मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक आणि शहर विभागाची पोलीस टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवून मंदिराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक चौकशीत काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याचे समजते. पोलिसांकडून या चोरीमागे असलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
सालासार मंदिर हे जुने शहरातील एक श्रद्धास्थान असून, दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. दिवाळीच्या सणात मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचे आयोजन केले गेले होते. अशा पवित्र आणि गर्दीच्या काळातच चोरीसारखी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भय आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की वाचा - Jalgaon News : मोठी कारवाई, नियमांचं उल्लंघन करणं भोवलं, ३ वैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी रद्द
दरम्यान, पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, आजूबाजूच्या भागातील दुकाने आणि रहिवाशांकडूनही माहिती घेतली जात आहे. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलावण्यात आले असून, पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.
शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाई करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. सणासुदीच्या काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.