- शुभम बायस्कार, अमरावती
बँकेमध्ये अधिकारी असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत डॉक्टर पतीने आईवडिलांच्या मदतीने तिची हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. इतकेच नव्हे तर महिलेचा मृतदेह फासावर लटकवून तिने आत्महत्येचा बनावही आरोपींनी रचला. पण सत्य फार काळ लपून राहिले नाही. या प्रकरणी डॉक्टर पती, सासू-सारे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीतील अर्जुननगर परिसरामध्ये 24 मे रोजी घडलेल्या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.
नेमकी काय आहे घटना?
दिप्ती चेतन सोळंके (वय 34 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. दिप्तीच्या हत्येप्रकरणी पती डॉ. चेतन ज्ञानदेव सोळंके (वय 36 वर्षे), सासरे ज्ञानदेव सोळंकेसह सासूलाही अटक करण्यात आली आहे. चेतन हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड वाढोना येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे. वर्ष 2018मध्ये लग्न झाल्यापासून चेतन पत्नी दिप्तीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सासू-सासरे देखील त्याला प्रोत्साहन देत होते. पण 24 मे रोजी या संशयाने टोक गाठले आणि या सर्वांनी मिळून दिप्तीचा जीव घेतल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.
(नक्की वाचा: मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार, तणावामुळे परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात)
कसे फुटले बिंग?
दिप्तीची हत्या करून आरोपींनी तिने आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. लेकीने आत्महत्या केल्याचा निरोप दिप्तीचे वडील रामभाऊ राठोड (वय 62 वर्षे) यांना 25 मे रोजी मिळाला. पण यावर त्यांनी हत्येचा संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दाखल केली. अखेर शवविच्छेदन अहवालामध्ये जबर मारहाण झाल्याने दिप्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि आरोपींचे बिंग फुटले.
(नक्की वाचा: थरकाप उडवणारा अपघात CCTVमध्ये कैद, तिला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने गमावला जीव)
वडिलांनी नोंदवली तक्रार
दिप्ती ही दर्यापूरमधील एका प्रतिष्ठित बँकेमध्ये ज्युनिअर असोसिएट पदावर कार्यरत होती. 23 मे रोजी सुटी असल्याने बुधवारी (22 मे 2024) संध्याकाळी ती दर्यापूरहून सासरी आली. याच सुमारास तिच्या मोबाइलवर कामाचा ई-मेल आला. यावरून पतीने पुन्हा दिप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. हा बँकेतील सहकाऱ्यांसोबत मौजमस्ती करण्याचा प्लान असल्याचे म्हणत पती, सासू-सासऱ्यांनी तिचा छळ केला. घडलेल्या प्रकाराची माहिती तिने वडिलांना सांगितली. यानंतर तिच्या मृत्यूचीच बातमी आल्याचे रामभाऊ राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे.
(नक्की वाचा: राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये 32 जणांचा जीव घेणार ती ठिणगी, पाहा CCTV VIDEO)
मृत विवाहितेच्या वडिलांची तक्रार आणि शिवविच्छेदन अहवालावरून पतीसह सासू-सासरे आणि नणंदेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण पतीसब सासू-सासर्यांना अटक करण्यात आलीय. 28 मेपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती गाडगे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे यांनी दिली.
दाम्पत्याचा सव्वा दोन वर्षाचा मुलगा
चेतन आणि दिप्तीचे लग्न 18 डिसेंबर 2018 रोजी झाले होते. या दाम्पत्याला सव्वा दोन वर्षाचा मुलगा आहे. लग्नाच्या वेळेस दीप्ती वर्धेला तर चेतन नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी कार्यरत होते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी दिप्तीची दर्यापूर येथे बदली झाली. सुटीच्या दिवशी ती सासरी येत असे. पण संशयामुळे आज चेतन आणि दिप्तीचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.