Atal Setu News: आर्थिक विवंचनेमुळे तणावात असलेल्या एका 38 वर्षीय इंजिनिअर तरुणाने अटल सेतूवरून (Atal Setu Tans Harbour Bridge) उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (24 जुलै) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
अटल सेतूवरून समुद्रात घेतली उडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन कुरुतुरी (K Shriniwas) असे समुद्रात उडी घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. श्रीनिवास हा डोंबिवलीतील रहिवासी होता. 24 जुलै 2024 रोजी 12.24 वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवर त्याने आपली कार थांबवली आणि समुद्रात उडी घेतली. ही घटना अटल सेतूवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. उरण तालुक्यातील न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. यादरम्यान त्याच्यासोबत कारमध्ये कोणी होते की नव्हते, हे कळू शकलेले नाही.
(नक्की वाचा: पोटच्या मुलीला तृतीयपंथीयांच्या संस्थेकडं सोपवलं, कल्याणमधील धक्कादायक प्रकार!)
श्रीनिवासनचा शोध सुरू
नवी मुंबई पोलिसांसह अटल सेतू बचाव पथक, नवी मुंबई पोलीस आणि स्थानिक मच्छिमारांकडून श्रीनिवासचा शोध घेण्यात येत आहे. पण समुद्राला भरती असल्याने शोधमोहीमेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या श्रीनिवासन परदेशामध्ये नोकरी करत होता. सात-आठ महिन्यांपूर्वी मायदेशी येऊन त्याने व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण व्यवसायामध्ये आर्थिक समस्या जाणवू लागल्याने श्रीनिवासनने आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते आहे.
( नक्की वाचा : डोंबिवलीतील महिलेला मित्रासोबतची मस्ती नडली, तो वाचला ती मात्र... )
आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांशी साधला संवाद
मंगळवारी (23 जुलै) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडलेल्या श्रीनिवासनने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी काही तास आधी पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीशी फोनवरून संवाद साधला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. श्रीनिवासन यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ते गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होते.
(नक्की वाचा : जव्हारच्या आश्रमशाळेत प्रवेश, 4 दिवसांनंतर बाथरूममध्ये मुलीचा मृतदेह पाहून खळबळ)
यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
यापूर्वीही 2023मध्येही त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुवेतमध्ये काम करत असताना त्याने फरशी स्वच्छ करणारे लिक्विड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.