Ananat Garge Arrested: भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉ. गौरी गर्जे- पालवे यांनी आत्महत्या केली नसून ही पतीनेच हत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. याचबाबत आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून अनंत गर्जे याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.
पत्नीचा छळ, हत्येचा आरोप..
सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या वरळी भागात राहणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अनंत गर्जे यांच्यासह त्यांची बहीण, भावावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पत्नीला रुग्णालयात दाखल करुन अनंत गर्जे फरार झाल्याचा आरोप गौरी गर्जे- पालवे यांच्या कुटुंबियांनी केला होता. अशातच आता पत्नीच्या मृत्यू घटनेनंतर अनंत गर्जे आज मध्यरात्री वरळी पोलिस स्थानकात हजर झाले. त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सध्या सुरु आहे.
पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
याप्रकरणी पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध होते, तसेच गौरी गर्जेचा छळ सुरु होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. अनंत गर्जे यांचे पहिले लग्न झाले होते, मात्र याबद्दल गौरी गर्जे यांना माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वीच गौरी गर्जे यांना याबद्दल समजले, तेव्हापासून त्या तणावात होत्या, अशीही माहिती समोर आले आहे.
दरम्यान, घटनेच्यावेळी मी घरी नव्हतो, असा खुलासा अनंत गर्जेंनी केला होता. मी घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. मी घाबरून 31 व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी ३० व्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतल्या अवस्थेत होती, असं त्यांनी सांगितले होते. मात्र आता पोलिसांच्या चौकशीतून काय समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.