Sangli News : कर्तव्यनिष्ठ श्वानाची सेवा थांबली! लाखोंचा अमली पदार्थांचा साठा शोधणाऱ्या पोलीस दलातील लुसीचा मृत्यू 

लुसीचे हस्तक अंमलदार म्हणून तौफिक सय्यद आणि विनोद थोरात काम पाहत होते. लुसीच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला होता. लुसीला अखेरचा निरोप देताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, प्रतिनिधी

सांगली जिल्हा पोलीस दलातील अमली पदार्थ शोधक श्वान 'लुसी' हिने आठ वर्षाच्या सेवाकाळात अनेक गुन्हे उघडकीस आणत पोलिसांना साथ दिली. बुधवारी दुपारी हृदयविकार आणि किडनीच्या आजाराने तिचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात शोककळा पसरली. पोलिसांनी मानवंदना देत तिला निरोप दिला.

जर्मन शेफर्ड जातीची श्वान 'लुसी' हिचा जन्म 2 जुलै 2017 रोजी झाला होता. 16 नोव्हेंबर 2017 ते 26 मे 2018 या कालावधीत तिने अलवर (राजस्थान) येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात अमली पदार्थ शोधक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर ती सांगली पोलीस दलात दाखल झाली. आठ वर्षे तिने अत्यंत जबाबदारीने सेवा बजावली.  20 ऑक्टोबर 2020 रोजी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तेरा लाखांहून अधिक किमतीचा गांजासाठा जप्त करण्यात आला होता. लुसीने अचूक वास घेत गुन्हेगाराच्या घरात पोत्यामध्ये लपविलेले अमली पदार्थ ओळखले आणि पोलिसांना इशारा दिला होता. त्याआधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून गुन्हा उघड केला होता.

गतवर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान तपासणी मोहिमेत लुसीने आंतरराज्य सीमा नाक्यांवर अवजड वाहनांची तपासणी केली होती. पोलीस दलातील श्वान लुसी हिला पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सतीश शिंदे, एन. एस. मोरे यांनी श्रद्धांजली वाहिली.

नक्की वाचा - 75 गुन्ह्यातील चेन स्नॅचरवर धाडसी नणंद-भावजयीची झडप, मंगळसूत्र चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

श्वान पथकातील सहकाऱ्यांना अश्रू अनावर

लुसीचे हस्तक अंमलदार म्हणून तौफिक सय्यद आणि विनोद थोरात काम पाहत होते. दोघेही प्रशिक्षण कालावधीपासून तिच्यासोचत होते. त्यामुळे त्यांच्यात वेगळेच नाते तयार झाले होते. त्यांना तिचा लळा लागला होता. लुसीच्या मृत्यूने त्यांना मोठा धक्का बसला होता. लुसीला अखेरचा निरोप देताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते. 

Advertisement

एका महिन्यात दोन श्वानांचा मृत्यू

महिन्याभराच्या काळात पोलीस दलातील दोन श्वानांचा मृत्यू झाला. 8 जुलै रोजी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या डॉबरमन जातीच्या कुपर श्वानाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर आता लुसीचेही निधन झाल्याने श्वानपथकातील कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. अनेक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले. कोल्हापूर परिक्षेत्रीय ड्युटी मीट स्पर्धेमध्येही अमली पदार्थ शोधणे अशा प्रकारे विभागात उल्लेखनीय कामगिरी करून लुसीने श्वानपथकाची मान उंचावली. 24 जुलै रोजी लुसी आजारी पडली होती.

यानंतर तिने खाणेपिणे बंद केले होते. तिला तातडीने मिरजेतील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथे किडनी व हृदयविकाराचा आजार समोर आला. अखेर बुधवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी मुख्यालयात पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, श्वान पथकाचे प्रमुख एन. एस. मोरे, समीर सनदी व श्वानपथकातील कर्मचाऱ्यांनी लुसीला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर बंदुकीच्या फैऱ्या झाडून तिला अखेरचा निरोप देण्यात आला. 

Advertisement
Topics mentioned in this article