ED summoned Dinesh Bobhate : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई ( Uddhav faction leader Anil Desai) यांचे निकटवर्तीय दिनेश बोभाटे यांना ईडी (ED) ने समन्स बजावले आहे. मनी लाँड्रीग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. बोभाटे यांना या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना ईडीनं दिली आहे.
अनिल देसाई अडचणीत
दिनेश बोभाटे यांच्यावर काही दिवसांपूर्वी सीबीआयनं भ्रष्टाचाराचा खटला दाखल केला होता, त्यानंतर ईडीनं ही कारवाई केलीय. 2 कोटी 58 लाखांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयनं बोभाटे यांच्यावर आरोप ठेवला आहे. त्यापाठोपाठ ईडीनं समन्स बजावलंय. बोभाटे 2013 ते 2023 दरम्यान एका वीमा कंपनीमध्ये असिस्टंट आणि सिनिअर असिस्टंट म्हणून काम करत होते. या वीमा कंपनीत काम करताना त्यांनी जवळपास 36 टक्के बेहिशेबी संपत्ती कमावली, असा त्यांच्यावर आरोप आहे,' असं वृत्त एबीपी न्यूजनं दिलंय.
अनिल देसाई उद्धव ठाकरे गटातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं मानलं जातंय. दक्षिण मध्य मुंबईतून त्यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्या निकटवर्तीयावर ईडीनं ही कारवाई केल्यानं विरोधकांना मोठा मुद्दा मिळाल्याचं मानलं जातंय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.