Eid E Milad 2025 Holiday: सोमवारीही शाळा, कॉलेज आणि ऑफिस बंद राहणार ? सरकारने दिली माहिती

Eid E Milad 2025 Holiday: ईद-ए-मिलाद शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी असून अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर म्हणजेच शनिवारी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Eid E Milad 2025 Holiday: महाराष्ट्र शासनाने ईद-ए-मिलादसाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीत बदल केला आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 3 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही सुट्टी शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025 ऐवजी सोमवार, 8 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज सोमवारी बंद राहतील. मूळ अधिसूचनेनुसार, ईद-ए-मिलादची सुट्टी शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी होती. मात्र, मुस्लिम संघटनांनी 21 ऑगस्ट 2025 रोजी बैठक घेऊन जुलूसचे आयोजन सोमवार, 8 सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतला. यामागे 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने होणारी संभाव्य गर्दी टाळणे आणि शांतता राखणे हा उद्देश होता.

नक्की वाचा: राज्यात कामगारांचे कामाचे तास 9 वरुन 12 तासांपर्यंत; सरकारचा मोठा निर्णय

मुस्लिम संघटनांची विनंती

शासनाने नवीन वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये, ईद-ए-मिलादची सुट्टी 5 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केली होती. ईदच्या निमित्ताने जुलूस काढले जातात. ईदच्या दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशी येत असल्याने प्रसासनावर मोठा ताण असतो. खासकरून पोलिसांवर मोठा ताण असतो. ही बाब लक्षात घेऊन मुस्लिम संघटनांनी ईदच्या निमित्ताने काढण्यात येणारा जुलूस विसर्जनानंतर काढण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. त्यानुसार ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढण्यात येणारा जुलूस 8 सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे मुस्लिम संघटनांनी ईदची सुट्टी सोमवारी द्यावी अशी मागणी केली होती. ही विनंती लक्षात घेऊन सरकारने ईद-ए-मिलादची सोमवारी म्हणजेच 8 सप्टेंबरला सुट्टी जाहीर केली आहे.  

नक्की वाचा: मिया खलिफालाही दर्शनाला बोलवा! लालबागचा राजाच्या VIP दर्शनावर Insta Influencer संतापला

सोमवारची सुट्टी फक्त मुंबईसाठी?

या निर्णयाचा थेट फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. नोकरदारांना आणि विद्यार्थ्यांना सलग तीन दिवसांची सुट्टी (शनिवार, रविवार, सोमवार) मिळणार आहे. या सुट्टीमुळे अनेक जण बाहेर फिरण्यासाठी किंवा गावी जाण्याचा विचार करत आहेत.  सरकारने काढलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की 8 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी, शुक्रवार 5 सप्टेंबर 2025 ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात आली आहे.