मंगेश जोशी, जळगाव
Jalgoan News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील 'मुक्ताई' बंगल्यात मंगळवारी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या चोरीनंतर आज (29 ऑक्टोबर) एकनाथ खडसे यांनी स्वतः मुंबईतून जळगावमध्ये दाखल होत आपल्या घराची पाहणी केली.
घराची पाहणी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी अत्यंत गंभीर आरोप केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या घरातून सोने-चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू नव्हे, तर अत्यंत महत्त्वाची पुराव्याची कागदपत्रे, सीडी (CD) आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेले आहेत.
(नक्की वाचा- Jalgaon Crime: खळबळजनक! एकनाथ खडसेंच्या बंगल्यात जबरी चोरी; पोलिसांनाच आव्हान)
बेडरूममधून महत्त्वाची कागदपत्रे गायब
एकनाथ खडसे यांनी घराच्या तपासणीनंतर सांगितले की, त्यांच्या बेडरूममधील कपाटातून अनेक महत्त्वाच्या सीडी, पेन ड्राईव्ह आणि काही संवेदनशील कागदपत्रे चोरीला गेली आहेत. खडसे यांनी दावा केला आहे की, चोरीला गेलेल्या या सीडी आणि पेन ड्राईव्हमध्ये असलेले पुरावे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते.
चोरट्यांनी इतर वस्तूंकडे दुर्लक्ष करून केवळ पुराव्याच्या कागदपत्रांवर आणि डिजिटल पुराव्यांवर लक्ष केंद्रित केल्याचा त्यांचा आरोप आहे. या आरोपामुळे, या चोरीमागे सामान्य चोरीचा उद्देश नसून, राजकीय किंवा वैयक्तिक हेतूने हे महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या या गंभीर आरोपामुळे जळगाव पोलीस तातडीने कामाला लागले असून, या चोरीच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाच्या तपासातून काय समोर येते आणि या चोरीमागे कोणता उद्देश आहे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world