Deputy CM Sunetra Pawar Emotional Reaction : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एका मोठ्या आणि भावूक बदलाची नोंद झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील लोकभवन येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. या नियुक्तीनंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, यात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार
उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, आदरणीय अजितदादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला होता.
आज त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत असताना आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून ही जबाबदारी स्वीकारताना मन भरून येत आहे. राज्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी या प्रतिक्रियेतून स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : NCP Merger : अजित पवारांच्या प्रस्तावाला स्वपक्षातूनच विरोध, 2-3 नेते...जयंत पाटलांचा मोठा धमाका! पाहा VIDEO )
कर्तव्यनिष्ठा आणि जनतेची साथ हेच बळ
आपल्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाबद्दल बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी हाच आपला खरा आधार आहे. अजित पवार यांचे स्वप्न असलेल्या न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण अखंड प्रामाणिकपणे काम करत राहू, अशी ग्वाही त्यांनी राज्यातील जनतेला दिली आहे.
( नक्की वाचा : Sunetra Pawar : पडद्यामागची ताकद आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; वाचा कसा आहे सुनेत्रा पवारांचा प्रवास )
नव्या आशेने महाराष्ट्राची सेवा करणार
महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, या कठीण काळात जनतेने दिलेली साथ हेच त्यांचे खरे बळ आहे. लोकांच्या विश्वासाच्या जोरावर आणि अजितदादांच्या विचारांना स्मरून नव्या आशेने आपण पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आता कशा प्रकारे कारभार पाहतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
"आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर' यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.… pic.twitter.com/Z4vHP0BzkF
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) January 31, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world