प्रतिनिधी, लक्ष्मण सोळुखे
शेतीची मशागत महागली असून रासायनिक खतांचे दर गगनाला भिडल्याने बळीराजाकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. शेतमजूराकडून आर्थिक अडवणूक होत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. त्यातच दिवसागणिक वारेमाप भडकलेल्या महागाईच्या वरवंट्याखाली शेतकऱ्यांचे आर्थिक गणित भरडून निघू लागले आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर वाढलेल्या खर्चांनी शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च सातत्याने वाढू लागला आहे. मात्र खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी निघत आहे. शिवाय शेतातील उत्पन्नदेखील कमालीचे घटले आहे. परिणामी ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्याला आर्थिक खर्चाची हातमिळवणी करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच 2021 पासून खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खत दरात मोठ्या प्रमाणात वाढ करायला सुरुवात केली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. चार वर्षांपूर्वी एका खताच्या पोत्यामागे 200 ते 600 रुपयांनी वाढ झाली होती. त्यावेळी सरासरी 454 रुपयांची दर वाढ झाली होती. या वर्षीही यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित मोडीत निघालं आहे.
खत | 2014 | 2021 | 2024 |
युरिया | 242 /- | 265/- | 266/- |
डीएपी | 900/- | 1125/- | 1350/- |
पोटॅश | 550/- | 850/- | 1100/- |
सुपर फॉस्फेट | 350/- | 450/- | 500/- |
एमओपी | 650/- | 1270/- | 1700/- |
10:26:26 | 950/- | 1175/- | 1700/- |
19:19:19 | 850/- | 1285/- | 1650/- |
20:20:0 | 950/- | 975/- | 1300/- |
13:32:16 | 850/- | 1190/- | 1470/- |
24:24:0 | 920/- | 1220/- | 1700/- |
रासायनिक खतांच्या दरात कंपन्यांनी भरमसाठ आणि मनमानी वाढ केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या अर्थकारणावर होऊ लागला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला सर्वाधिक फटका हा शेती मशागतीचे दर महाग झाल्याने बसला आहे. शेतमजुरांकडून तर मोठीच अडवणूक होत असल्याने शेतकरी पेरणी, आंतरमशागती यासाठी ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर देखील वाढले आहेत. यामुळे शेती व्यवसाय अडचणीचा ठरत चालला आहे. परिणामी सामान्य शेतकऱ्याला शेती पिकवणे आता अवघड होऊ लागले आहे.
जालन्यातील अकोला निकळक गावातील रेणुका कृष्णा सुरासे या महिलेकडे पाच एकर शेती आहे. त्यांचं 12 वीपर्यंत शिक्षण झालंय. गेल्या चार वर्षापासून त्या शेती व्यवसाय करतात. पाच एकर शेतातील एका एकर क्षेत्रावर त्यांनी मोसंबी फळबाग लागवड केली आहे. तर उर्वरित क्षेत्रावर त्यांनी गेल्यावर्षी सोयाबीन लागवड केली होती. त्यात त्यांना रासायनिक खत आणि फवारणीवर 20 हजार रुपय खर्च झाला. बाजारात सोयाबीनची विक्री केल्यावर त्यांना त्यावर 15 हजाराचा नफा ही झाला. मात्र खुरपणी, निदणी, सोगणी यामध्ये त्यांचा 7 हजार रुपये खर्च झाला. चांगले दर मिळेल अशी त्यांना आशा असताना सोयाबीन आयात धोरणाचा त्यांना फटका बसला आहे. आता त्यांना शेती न परवडणारी झाल्याने त्यांच्या पतीला मिळेल ते काम करणायची वेळ आलीये. सरकारने खतावरील वाढलेले दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शेती मालाला चांगला भाव द्यावा तर शेतकऱ्याला चांगले दिवस येतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा - राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के
रासायनिक खतांच्या दरात नुकतीच वाढ झाल्याने या दर वाढीविरोधात शेतकरी वर्गामध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. एखादा अपवाद वगळता सर्वत्र खतांची विक्री नव्या दराने होऊ लागली आहे. यातून अनेक कृषी सेवा केंद्र चालक मनमानी करताना दिसत आहे. मात्र यावर्षी चांगला पाऊस पडेल आणि चांगलं उत्पन्न आपल्या हाती येईल या आशेवर शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतला आहे.