प्रशांत जवेरी, नंदुरबार: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत महायुतीने पुन्हा एकदा राज्यात सत्ता खेचून आणली आहे. विधानसभेच्या या दणदणीत विजयानंतर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटाच्या आमदारांकडून जोरदार जल्लोष केला जात आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या विजयी मिरवणुकीत जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबारमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. या विजयानंतर पाडवी यांच्याकडून विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १० बँड पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मोठ्या संख्येने तरुण या रॅलीमध्ये आले होते. या मिरवणुकीत काही तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. बँडच्या तालावर नाचत असतानाच दोन गट भिडले अन् तुफान मारामारी सुरु झाली.
नक्की वाचा: Exclusive : राज्यात सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरला, कसं असेल संभाव्य मंत्रिमंडळ?
एकीकडे मिरवणुकीची प्रचंड गर्दी आणि याच गर्दीत तरुणांमध्ये फ्री- स्टाईल हाणामारी सुरु झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या तुफान राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तरुणांचा हा वाद नेमका कशामुळे झाला? याबाबतचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने तब्बल 236 जागा जिंकण्याचा पराक्रम केला. यामध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 132 जागा, शिवसेना शिंदे गटाने 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. या विजयासोबतच आता महायुतीमध्ये सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता आहे.