राकेश गुडेकर, प्रतिनिधी
first houseboat in Konkan : बाल्टिक समुद्रावरुन अत्याधुनिक बोटी लवकरच जलवाहतुकीसाठी आणण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केली. त्यामुळे मुंबईतील जल प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या दरम्यान कोकणातील जल पर्यटनात पहिली हाऊसबोट दाखल झाली आहे.
कोकणाच्या जल पर्यटनाला एक नवा आयाम देत माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांची भव्य हाऊसबोट दाभोळ खाडीमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे या हाऊसबोटमध्ये आठ खोल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने खोल्या असलेली ही महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कोकणाच्या जलपर्यटनाला एक आलिशान अनुभव मिळणार आहे.
कोकणातील खाड्या बोटीच्या माध्यमातून जोडून डॉ. मोकल यांनी यापूर्वीच कोकणच्या पर्यटन क्षेत्रात वेगळी क्रांती केली आहे. आता सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तसेच माजी आमदार डॉक्टर विनय नातू, संजय यादवराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं.
नक्की वाचा - Ro Ro service : कोकणवासियांसाठी चांगली बातमी; रो-रो सेवेत आणखी 3 स्थानकांवर थांबे
कांदळवनाचाही अनुभव घेता येणार...
या हाऊसबोटमुळे पर्यटकांना दाभोळ खाडीचं शांत आणि नयनरम्य सौंदर्य, जैवविविधता, कांदळवन जवळून अनुभवता येणार आहे. तसेच कोकणी खाद्य पदार्थांची चवही चाखता येणार आहे. दाभोळ खाडीतील ही हाऊसबोट कोकणातील पर्यटकांना आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मोकल यांनी व्यक्त केला आहे.
हाऊसबोटीचे दर किती?
या हाऊसबोटीत Deluxe आणि Suite अशा दोन प्रकारच्या खोल्या आहेत. यातील Deluxe खोलीचे एका दिवसाचे दर 6000 रुपये आहेत. दोन माणसांसाठी ही रक्कम आकारली जाणार आहे. या 6 हजारात सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं आणि रात्रीचं जेवण याचा समावेश असेल.
Suite साठी दोन माणसांसाठी ८ हजार रुपये आकारले जातील. या प्रकारच्या खोल्यांसाठी स्वतंत्र डेक उपलब्ध असेल. या ८ हजारात सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं आणि रात्रीचं जेवण याचा समावेश असेल. सुप्रिया हाऊसबोटच्या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करू शकता.