Ratnagiri News: नितेश राणेंचे परफेक्ट नियोजन! रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात मोठी वाढ

82 नौकांवरील प्रतिवेदन निकाली काढण्यात आली असून सदर नौकांवर रक्कम 31 लाख 19 हजार रुपये एवढी शास्ती आकारण्यात आली आहे असे आयुक्तांनी सांगितले.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी: ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या जिल्ह्याच्या मत्स्य उत्पादनात  3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे.  संपत आलेल्या सन 2024-25 या मत्स्य वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन 71,303 मेट्रिक टन एवढं झालं आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे मत्स्य उत्पादनातील हे सकारात्मक परिणाम दिसू लागले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले कि, सन 2023-24 मध्ये जिल्ह्याचं सागरी मत्स्योत्पान 67,907 मे. टन होतं.  तर सन 2024-25 मध्ये जिल्ह्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये 3,396 मे. टनने वाढ झाली असून हे मत्स्योत्पादन 71,303 मे. टन एवढं झालं आहे. विभागामार्फत होणारी दिवस, रात्र सागरी गस्त व ड्रोनव्दारे होणारी देखरेख यामुळे मासेमारीवर नियंत्रण येत असून कृत्रिम भित्तीका पाखरण तसेच खोल समुद्रातील मासेमारीमुळे मत्स्योत्पादनामध्ये वाढ झाल्याचे तावडे यांनी सांगितले.

नक्की वाचा - IPL सट्ट्याची चटक, तरुण बनला चोर ! लग्नाचं कार्ड दाखवून वृद्ध महिलेला...

तसेच ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय ना. नितेश राणे यांनी घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि. 09 जानेवारी 2025 पासून ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. तेव्हापासून या यंत्रप्रणालीव्दारे अनधिकृत मासेमारी नौकांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आज अखेर एकूण 367 अनधिकृत मासेमारी नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 82 नौकांवरील प्रतिवेदन निकाली काढण्यात आली असून सदर नौकांवर रक्कम 31 लाख 19 हजार रुपये एवढी शास्ती आकारण्यात आली आहे असे आयुक्तांनी सांगितले.