Alibaug News : अलिबागजवळ मच्छिमार बोट बुडाली, 5 खलाशांनी 9 तास पोहोत गाठला किनारा; तिघेजण अद्याप बेपत्ता

अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली असून त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली असून त्यावरील 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला आहे. त्या पाचही जणांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेत. बोटीवर एकूण आठ खलाशी होते. उर्वरित तीन खलाशांचा शोध सुरू आहे. 26 जुलै रोजी सकाळी 7 वाजता करंजा येथील मच्छीमार बोट समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. सकाळी आठ वाजता खांदेरी किल्ल्याजवळ आली असता ही बोट लाटांच्या जोरदार माऱ्याने बुडाली. बोटीवरील 5 खलाशांनी खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 तास पोहून ते दिघोडी किनाऱ्यावर लागले. 

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात आणले. मासेमारीवरील बंदी उठायला आणखी आठवडा बाकी असतानाच मच्छीमार बोटी समुद्रात गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची 'तुळजाई' नावाची बोट कारंजा येथून 26 जुलै रोजी सकाळी 7.00 वाजता निघून सुमारे 8.30 वाजण्याच्या दरम्यान रायगड हद्दीतील खंदेरी जवळपास पाण्यात पलटी होऊन बुडाली. त्यामध्ये असणा-या आठ जणांपैकी 5 जणं पोहत किनाऱ्यापर्यंत आले. ते किरकोळ जखमी आहेत. त्यांना अलिबाग येथील सिव्हील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे.

बोटीवरील बचावलेले 5 खलाशी


1) हेमंत बळीराम गावंड, 45,  रा.आवरे ता. उरण.
2) संदीप तुकाराम कोळी, 38,  रा. करंजा ता. उरण.
3) रोशन भगवान कोळी, 39, रा. करंजा ता. उरण.
4) शंकर हिरा भोईर, 64, रा. आपटा ता. पनवेल.
5) कृष्णा राम भोईर, 55, रा. आपटा ता.पनवेल.

अद्याप मिसिंग व्यक्तींची नावे


1) नरेश राम शेलार.
2) धीरज कोळी, रा. कासवला पाडा, ता. उरण.
3) मुकेश यशवंत पाटील.

सदर मिसिंग व्यक्तींचा रायगड पोलिसांकडून ड्रोनच्या मदतीने किनाऱ्याजवळ शोध सुरू आहे.

Topics mentioned in this article