Thane Baby Selling Racket: नवजात बाळाची 6 लाखांना विक्री, 5 जणांना अटक; मुलं चोरणारी गँग हाती लागण्याची शक्यता

Thane Missing Kids: या टोळीने बाळासाठी 6 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 20 हजार रुपये टोकन म्हणून यूपीआय (UPI) द्वारे स्वीकारले, तर उर्वरित 5 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात घेण्याचे ठरले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

ठाणे जिल्ह्यात मानवी तस्करीचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे पोलिसांनी 7 दिवसांच्या नवजात बालकाची 6 लाख रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. शुक्रवारी पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला (AHTC) या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, बुधवारी रात्री बदलापूर पश्चिम परिसरातील एका हॉटेलजवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाद्वारे या टोळीशी संपर्क साधला आणि व्यवहाराची खात्री केली. या टोळीने बाळासाठी 6 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी 20 हजार रुपये टोकन म्हणून यूपीआय (UPI) द्वारे स्वीकारले, तर उर्वरित 5 लाख 80 हजार रुपये रोख स्वरूपात घेण्याचे ठरले होते.

नक्की वाचा: चिंताजनक! भिवंडीमध्ये दोन दिवसांत 4 मुले बेपत्ता, पालकांमध्ये भितीचे वातावरण

अटक केलेल्यांमध्ये महिलेचाही समावेश

अटक केलेल्यांमध्ये शंकर मनोहर (वय 36), रेश्मा शेख (वय 35), नितीन मनोहर (वय 33), शेखर जाधव (वय 35) आणि आसिफ खान (वय 27) यांचा समावेश आहे. या बाळाची आई कोण आहे आणि हे बाळ कोठून आणले, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. अपत्यहीन जोडप्यांना अशा प्रकारे बाळ विकण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस उपायुक्तांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात काही रुग्णालये किंवा नर्सिंग होम्सचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.

नक्की वाचा: शाळेच्या वॉशरुमध्ये मैत्रिणीला.. तर शिक्षिकेला केले प्रपोज, विद्यार्थिनीच्या प्रतापाने पुणे हादरले

'सबिना'ला पकडणे महत्त्वाचे

या टोळीने बाळाची विक्री करण्यासाठी एका हॉटेलबाहेर व्यवहार ठरवला होता. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हे आरोपी अलगद अडकले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इगतपुरी आणि मुंबईतील एजंट्सचा समावेश आहे. या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारे बालकांची विक्री केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. बदलापूर (पश्चिम) पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्हाला संशय आहे की हे एक मोठे रॅकेट असून, यामध्ये बालकांचे अपहरण करून त्यांची विक्री केली जाते. या बाळाला सध्या सरकारी निगा केंद्रात ठेवण्यात आले आहे." फरार असलेल्या सबिना नावाच्या महिलेच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. 
 

Topics mentioned in this article