Nashik News: नाशिकला महापूराचा धोका! दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पोहोचलं पाणी!'या' भागांमध्ये येणार पाणी

Nashik News: रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने उत्तर महाराष्ट्रात जोरदार तडाखा दिला असून या पावसानं नाशिक शहराची पुरती दाणादाण उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nashik News: नाशिकच्या प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे.
नाशिक:

Nashik News: रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने उत्तर महाराष्ट्रात जोरदार तडाखा दिला असून या पावसानं नाशिक शहराची पुरती दाणादाण उडाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. ऐतिहासिक रामकुंड परिसर आणि आसपासची लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा वेढा इतका वाढला आहे की प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे.

होळकर पुलाखाली धोका पातळी गाठणार, सराफ बाजारावर टांगती तलवार

गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढवला जात आहे. सध्या धरणातून 12600 ते 13000 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून दुपारी रामकुंड परिसरातील होळकर पुलाखाली पाण्याचा प्रवाह 17390 क्युसेकवर पोहोचला होता. या ठिकाणी इशारा पातळी 13000 क्युसेक तर धोका पातळी 19000 क्युसेक इतकी आहे. 

Advertisement

गुरुवारी संध्याकाळी पाण्याचा विसर्ग वाढून तो 19000 क्युसेक पार करताच शहरातील सराफ बाजार आणि सखल भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पुराचे पाणी शिरण्याची थेट शक्यता निर्माण झाली आहे.

( नक्की वाचा : Kharif Crop Planning: अल निनोच्या संकटात शेती वाचवणार 'हा' फॉर्म्युला; यंदाच्या खरिपात 'या' पिकांची करा निवड )

रामसेतू पूल बुडाला, गाडगे महाराज पुलाला पाण्याचा स्पर्श

पावसाच्या अखंड धारेमुळे शहरातील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. रामकुंड परिसरातील रामसेतू पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, तर गाडगे महाराज पुलाला पुराचे पाणी टेकले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आणि महापालिकेने गोदाघाट परिसरातील सर्व दुकाने, टपऱ्या आणि स्टॉल्स तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत. नदीकाठच्या 3 ते 4 फुटांपर्यंतच्या इमारती आणि घरांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर, गौतमी गोदावरी आणि कश्यपी धरण परिसरात अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

यापूर्वी 2008 साली 42000 क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात आले होते, त्या तुलनेत यंदा परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

ग्रामीण भागात पुलांवर पाणी, त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक जखमी

शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यातील काही छोटे पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. काल वादळी वाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे एका भक्तावर पत्रा कोसळल्याने तो गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणासह संपूर्ण नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
 


Topics mentioned in this article