मेगेश जोशी, जळगाव
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
वैष्णवी साडी सेंटरजवळ रात्रीच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात चौधरी यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी धुळे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Maratha Reservation: मनोज जरांगे थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने निघणार, मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल)
हल्लेखोरांचा शोध सुरू, राजकीय वर्तुळात खळबळ
प्रभाकर चौधरी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा हल्ला कोणी आणि का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना केली आहेत. या घटनेमागे कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक वाद आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. या घटनेमुळे चाळीसगावातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.