प्रतिनिधी, संजय तिवारी
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांकडून घातपाताची शंका व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा निवडणुका तोंडावर असताना माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी (17 एप्रिल) मध्यरात्री भीषण अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे.
सुदैवाने या अपघातातून डॉ. परिणय फुके बचावले असून हा अपघात की घातपात अशी शंका घेतली जात आहे. डॉ. परिणय फुके मंगळवारी रात्री भंडारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. सभा आणि गावकऱ्यांशी चर्चा आटोपून रात्री उशिरा ते लाखनी येथे परत येत असताना रात्री 2 वाजताच्या सुमारास साकोलीजवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले.
पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली. त्यामुळे ही धडक टळली. पण त्यामागे असलेले त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले. यात या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. वाहनातील सुरक्षा रक्षक आणि इतर सहकाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. सबंधित अज्ञात वाहन नंतर पळून गेले. चालकाने प्रसंगावधान राखल्याने डॉ. फुके या भीषण अपघातातून बचावले. दरम्यान हा अपघात आहे की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा -धाराशिवमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आमदार उष्माघाताने कोसळले
नाना पटोलेंच्या वाहनाला ट्रकची धडक
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला भंडाऱ्याजवळील भीलवाडा गावाजवळ अपघात झाला होता. एका ट्रकने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली होती. या अपघातात नाना पटोले थोडक्यात बचावले. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नव्हते. या अपघातानंतर काँग्रेस नेता अतुल लोंढे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. विरोधी पक्ष नेत्यांना संपवून भाजपला निवडणुकीत जिंकायचं आहे का? असा सवाल त्यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला होता.