Nandurbar News इंदिराजींपासून राहुल गांधींपर्यंत...गांधी परिवाराचा 'सच्चा सेवक' गेला! कोण होते सुरुपसिंग नाईक

Surupsing Naik Death : काँग्रेसचे भीष्म पितामह आणि गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
Surupsing Naik Death : इंदिरा गांधी यांच्यापासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वच पिढ्यांशी नाईक कुटुंबाचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध राहिले आहेत.
नंदुरबार:

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

Surupsing Naik Death : काँग्रेसचे भीष्म पितामह आणि गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा अस्त झाला असून विशेषतः आदिवासी समाजाने आपला एक सच्चा सेवक गमावला आहे. 

इंदिरा गांधी यांच्यापासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वच पिढ्यांशी नाईक कुटुंबाचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घरगुती संबंध राहिले आहेत.

सामान्य सरपंचापासून  सुरुवात

सुरुपसिंग नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव या छोट्याशा आदिवासी वस्तीत झाला. अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि समाजाची सेवा करण्याच्या हेतूने राजकारणात प्रवेश केला. 1962 साली त्यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. 

त्यानंतर पंचायत समितीवर अपक्ष म्हणून निवडून येत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तत्कालीन धुळे-नंदुरबार काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदापर्यंत मजल मारली.

(नक्की वाचा : 'त्या' एका वाक्याने इतिहास घडला! राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली उद्धव ठाकरेंच्या युतीची Inside Story )
 

दिल्ली ते गल्ली असा गाजलेला राजकीय प्रवास

सुरुपसिंग नाईक यांनी 1972 साली पहिल्यांदा नवापूर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर मार्च 1977 मध्ये ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. मात्र, राज्याच्या राजकारणात रस असल्याने 1980 साली त्यांनी पुन्हा विधानसभा लढवली आणि राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 

Advertisement

काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. नवापूर विधानसभा मतदारसंघावर त्यांचे अनेक वर्षे एकहाती वर्चस्व होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांचे राजकीय वजन कधीही कमी झाले नाही.

गांधी घराण्याचे एकनिष्ठ आणि सच्चे सेवक

सुरुपसिंग नाईक यांची खरी ओळख म्हणजे गांधी घराण्याशी असलेली त्यांची निष्ठा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचा उल्लेख आदिवासींचा सच्चा सेवक असा केला होता. 

Advertisement

राज्यातील अनेक महत्त्वाचे राजकीय निर्णय घेताना त्यांचे मत विचारात घेतले जात असे. अगदी नवापूरमध्ये बसून ते राज्यातील राजकारणाची सूत्रे हलवत असत, इतका मोठा दबदबा त्यांनी निर्माण केला होता. सध्या त्यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक हे नवापूरचे आमदार म्हणून त्यांची राजकीय वारसा पुढे चालवत आहेत.

नवागावमध्ये होणार अंत्यसंस्कार

गेल्या काही दिवसांपासून सुरुपसिंग नाईक यांची प्रकृती साथ देत नव्हती. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 24 डिसेंबर रोजी सकाळी नवापूर येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी म्हणजे नवागाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article