Raj-Uddhav Thackeray Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड अखेर घडली आहे. गेल्या 20 वर्षांपासून राजकीय प्रवासात दोन वेगळ्या दिशांना असलेले ठाकरे बंधू आता एकाच मंचावर आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा झाली असून यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ही युती केवळ दोन पक्षांची नसून मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दोन भाऊ आणि दोन पक्ष एकत्र
गेल्या दोन दशकांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. अनेक निवडणुका झाल्या, अनेक राजकीय समीकरणे बदलली, पण हे दोन भाऊ एकत्र आले नव्हते. अखेर 24 डिसेंबर 2025 हा दिवस या युतीचा साक्षीदार ठरला. मुंबईत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी युती झाल्याचे जाहीर करण्यात आले. राज ठाकरे यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे या ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली आहे.
( नक्की वाचा : Raj-Uddhav Thackeray Alliance : ठाकरेंच्या युतीवर मोहर, पण.. 'या' कारणांमुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली )
युतीमागची नेमकी भावना काय?
राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे. ही केवळ एका मुलाखतीतील ओळ नव्हती, तर ती एक तीव्र भावना होती. याच भावनेतून दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
ही युती केवळ जागावाटपासाठी किंवा सत्तेसाठी नसून मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मुंबई आणि परिसरातून मराठी माणसाला हद्दपार करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्या शक्तींना रोखण्यासाठी ही वज्रमुठ बांधण्यात आली आहे.
जागावाटप आणि तांत्रिक बाबी
या युतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार किंवा कोणत्या जागांवर कोण लढणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. राज ठाकरे यांच्या मते, या तांत्रिक बाबी असून त्या योग्य वेळी घोषित केल्या जातील. सध्याचा मुख्य उद्देश हा जागांचा आकडा नसून मराठी माणसाचा आवाज बुलंद करणे हा आहे. मुंबईचा पुढचा महापौर हा शिवसेना आणि मनसेचाच असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त… pic.twitter.com/MAaGss4xWR
— Raj Thackeray (@RajThackeray) December 24, 2025
पत्रकार आणि माध्यमांना आवाहन
राज ठाकरे यांनी या लढाईत माध्यमांच्या भूमिकेवरही भाष्य केले आहे. आज अनेक संपादक आणि पत्रकार मराठी प्रेमी आहेत. अशा वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्याप्रमाणे माध्यमांनी साथ दिली होती, तशीच साथ आताही द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ही दोन पक्षांची लढाई नसून ही मराठी भाषेच्या आणि माणसाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले. येणाऱ्या काळात सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगत त्यांनी जय महाराष्ट्रचा नारा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world