जाहिरात

मुनगंटीवार यांच्या शिवकार्याचा मोठा गौरव! रायगडावर 1 ऑगस्टला मिळणार 'शिवसन्मान-2026' पुरस्कार

माजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 1 ऑगस्ट 2026 रोजी रायगडावर शिवसन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

मुनगंटीवार यांच्या शिवकार्याचा मोठा गौरव! रायगडावर 1 ऑगस्टला मिळणार 'शिवसन्मान-2026' पुरस्कार
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्या मार्गी लावल्या.
मुंबई:

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा शासनाच्या निर्णयांतून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम माजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांच्या कार्यकाळात घेतलेले ऐतिहासिक निर्णय, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि शिवचरित्राचा प्रसार यांमुळे त्यांची शिवभक्ती कृतीतून दिसून आली आहे, असे मत मुंबई भाजपचे पदाधिकारी अमोल जाधव यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल 1 ऑगस्ट 2026 रोजी रायगडावर त्यांना शिवसन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अफजलखान कबरीचे अतिक्रमण हटवणे आणि वाघनखे भारतात आणणे

सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्या मार्गी लावल्या. 10 नोव्हेंबर 2022 रोजी शिवप्रतापदिनी प्रतापगड परिसरातील अफजलखानाच्या कबरीभोवती झालेले अतिक्रमण हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रसिद्ध वाघनखे भारतात परत आणण्याची प्रक्रिया त्यांच्याच पुढाकारातून यशस्वीरीत्या पार पडली.

( नक्की वाचा : Vande Bharat : मराठवाड्यातील 'या' रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत? केंद्र सरकारने मंजूर केला 163 कोटींचा निधी )

कुपवाड्यात पुतळा अन् आग्र्यात शिवजयंती

शिवरायांचा वारसा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले. भारत-पाकिस्तान सीमेवरील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 फूट उंच पुतळा उभारण्यात आला. याशिवाय आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शासकीय पातळीवर शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा निर्णयही त्यांच्या काळात घेण्यात आला. दृष्टिहीन बांधवांसाठी ब्रेल लिपीत शिवचरित्र प्रकाशित करण्यात आले, तर महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला.

Latest and Breaking News on NDTV

शिवराज्याभिषेक सोहळा आणि विविध उपक्रम

रायगडावर दरवर्षी तिथीनुसार भव्य शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच सिंधखेडराजा येथे शिवसृष्टी उभारणीसाठी 50 कोटी रुपये आणि श्रीशैलम येथील शिवरायांच्या तपश्चर्या स्थळावर मंदिर उभारणीसाठी सुमारे 3.25 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. यासोबतच दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करणे, टपाल तिकीट जारी करणे आणि राज्यभरात 'जाणता राजा' महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्याचे कामही करण्यात आले, अशी माहिती देखील अमोल जाधव यांनी दिली. 

रायगडावर 'शिवसन्मान 2026' पुरस्काराने होणार गौरव

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जतन करण्यासाठी आणि शिवस्मारकांच्या संवर्धनासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने त्यांना "शिवसन्मान-2026" या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजी रायगडावर हा सोहळा पार पडणार आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com