शुभम बायस्कार, अमरावती:
B.T. Deshmukh Passed Away: विदर्भाच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्राचे मार्गदर्शक, अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अमरावतीत दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एका अभ्यासू आणि निस्पृह संसदीय पर्वाचा अंत झाला आहे. सलग तीन दशके विधान परिषदेत शिक्षकांचे आणि पदवीधरांचे अचूक प्रतिनिधित्व करणारे डॉ. देशमुख 'नुटा' (NUTA) संघटनेचे शिल्पकार होते.
सभागृहात केवळ आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे सरकारला धारेवर धरण्याचे त्यांचे कसब अद्वितीय होते. विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न राज्य पातळीवर मांडून त्यांनी या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता अमरावतीत अंत्यसंस्कार केले जाणार असून, सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्याची उद्धव यांची तयारी, पण ठेवली एक अट, ठाकरेंची गुगली
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ नेते प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाने महाराष्ट्र एका मोठ्या संघर्षशील नेतृत्त्वाला मुकला आहे. माझ्या जीवनातील एक मार्गदर्शक मी गमावला आहे, अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ज्यासाठी संघर्ष केला, त्यासाठी जीवन समर्पित असेच आयुष्य ते जगले. मला तर त्यांच्याकडून व्यक्तिगतदृष्ट्या खूप काही शिकायला मिळाले. त्यांचे कायमच मोलाचे मार्गदर्शन मिळायचे. राजकारण आणि समाजकारण एकच आहे, असे मानणार्या पिढीचे ते नेतृत्त्व करीत होते, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सर्वांचे बीटी सर. विदर्भाचे त्रिकालदर्शी वैभव. बाणेदार आणि पाणेदार माणूस. बीटी सरांचे आपल्यातून जाणे ही न भरून निघणारी हानी आहे. सामाजिक जाणिवांचे निरामय आणि राजकारणातील निरागस व्यक्तित्व आज लोप पावले. सार्वजनिक आयुष्य कसे असावे, याचा आरस्पानी वस्तुपाठ म्हणजे सरांचे जगणे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख, शिवाजीराव पटवर्धन यांच्या विचारांचे पाईक असलेल्या बीटी देशमुखांनी सलग पाच वेळा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केले, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.