शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर बॅटींग केली. त्यात त्यांनी बंडखोरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेच पण आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचं सांगत वातावरण चांगलचं तापवलं. शिवसेनेला साठ वर्ष झाली आहेत. मी गेल्या 12-13 वर्ष शिवसेनेचं नेतृत्व करत आहे. आता जे आरोप माझ्यावर होत आहेत, ते तुम्हाला खरे वाटत असतील, तर तुम्ही मला सांगा, मी आता या पदावरून पायउतार होतो असं सांगत त्यांनी एकच खळबळ उडवून दिली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी राजीनामा नको अशी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पुढच्याच क्षणाला उद्धव यांनी एक अट ही ठेवली. ते म्हणाले मी राजीनामा देतो पण माझी एक अट आहे. ही सोन्यासारखी शिवसेना चोरांच्या, दरोडेखोराच्या हाती जावू द्यायची नाही. असं सांगताच उपस्थितांनी तुम्हीच आमचे पक्षप्रमुख असं सांगत एकच गोंधळ केला.
आजच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी शिवसैनिकांना उद्धव यांनी भावनिक हाक घातली. ते म्हणाले मी तुम्हाला विचारतोय. आजपर्यंत तुम्ही मला जपलं. तो शिवसेना प्रमुखांचा आदेश होता. तो तुम्ही पाळला. मी कसा आहे तुम्हाला माहित आहे. माझ्यावर आपल्यातीलच कुणी बोट दाखवलं तर मला आवडत नाही. मी एका क्षणात मुख्यमंत्रीपद सोडलं होतं हे तुम्हाला ही माहित आहे. मी विधान परिषदेत आता ही बसू शकलो असतो. पण मी तसं केलं नाही असं ही उद्धव यावेळी म्हणाले. आता तुम्ही मला सांगितलं हे पक्षप्रमुखपद सोड तर मी ते सोडायला तयार आहे. या पदावर तुमच्या पैकी एक शिवसैनिक येवू द्या. तो शिवसेना पक्ष प्रमुख बनेल. त्याचं मला कौतूक वाटेल असं ही उद्धव यावेळी म्हणाले. त्यांनी पुढे ही आपली भूमीका मांडली.
उद्धव ठाकरे म्हणाले की मला नेतृत्वाची हाव नाही. मी आता हे पद सोडायला तयार आहे. पण जर कोणी माझ्यावर आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं. मी डगमगलेला नाही. खचललो नाही. मी पळणारा नाही. मी पहाडासारखा उभा राहीन. तुमच्या मनात माझ्या विषयी विश्वास आहे तोपर्यंत या पदावर राहीन. नाही तर हे पद सोडल्या शिवाय राहणार नाही असं भावनिक आवाहन ही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना केलं आहे. मी भेटत नाही असा आरोप केला जातो. जर मी भेटलो नसतो तर गधड्या तू निवडून आला असता का असा टोला उद्धव यांनी यावेळी ओमराजे निंबाळकर यांना लगावला. शिवाय आपल्यावर केलेले आरोप शिवसैनिकांना मान्य आहेत का अशी विचारणा ही त्यांनी या निमित्तानी केली.
( नक्की वाचा : Sanjay Raut: संजय राऊतांच्या 'ऑपरेशन तुडवा'ला शिंदेच्या शिलेदाराचे आव्हान; सुरक्षेसाठी शिवसैनिक बनणार ढाल )
ते म्हणाले उद्धव ठाकरेला किंमत नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे याला किंमत आहे. हे मला माहित आहे. मी हे विसरलेलो नाही. त्यामुळे मी, मी करत नाही. तुम्ही माझ्या सोबत आहात हीच माझी खरी ताकद आहे. शिवसेनेवर गेल्या 60 वर्षात अनेक संकटे आली. ती शिवसेनेनं झेलंली. अनेक संकट परतवून लावली. शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी नाही तर सत्तेचा जन्म शिवसेनेसाठी झालेला आहे. वर्धापन दिन दुख:त होईल असं अनेकांना वाटत होते. पण शिवसैनिक खचलेला नाही तर पेटलेला आहे असं म्हणत उद्धव यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world